कोल्हापूर : इचलकरंजी शहरातील एका खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर बाहेर असणाऱ्या आरोपीने आपल्या व्हॉट्सअॅपच्या स्टेटसला ‘मर्डरला एक वर्ष पूर्ण दुसऱ्या वादळाची तयारी सुरू’ असा व्हिडीओ लावल्याचे समोर आले आहे. त्यानंतर तातडीने पोलिसांनी दहशत निर्माण करू पाहणाऱ्या आरोपी आकाश संजय वासुदेव याला तात्काळ अटक केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, गेल्या वर्षी 10 डिसेंबर रोजी दीपक कोळेकर नावाच्या तरुणाचा पूर्ववैमनस्यातून खून झाला होता. याप्रकरणी अटक केलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आकाश वासुदेव याने पुन्हा एकदा दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. जामिनावर बाहेर आलेल्या या आरोपीने २१ डिसेंबरला आपल्या मोबाईलवर ‘मर्डरला एक वर्ष पूर्ण दुसऱ्या वादळाची तयारी सुरू’ अशा पद्धतीचा व्हिडीओ whatsapp स्टेटस म्हणून ठेवला. त्यानंतर पोलिसांनी हे स्टेटस सोशल मीडियावर बघताच तात्काळ या आरोपीला अटक केली आहे.