A young woman was abducted, gang-raped and forcibly poisoned
महाराष्ट्र

तरुणीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार, बळजबरीने विष पाजून केली हत्या

जळगाव : २० वर्षीय तरुणीचे अपहरण करून तिघांनी तिच्यावर बलात्कार केला. अत्याचार केल्यानंतर पीडित तरुणीला शिवीगाळ व मारहाण करत बळजबरीने विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्यातील पारोळा शहरात ही धक्कादायक घटना घडली आहे. पीडित तरुणीचा आज, मंगळवारी पहाटे धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पीडित तरुणी पारोळा तालुक्यातील टोळी या गावातील रहिवासी होती. दिवाळीसाठी ती ३ नोव्हेंबर रोजी तिच्या भावासह पारोळा येथे मामाच्या घरी आली होती. ७ नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजता तरुणी औषधे आणण्यासाठी बाहेर जात असल्याचे सांगून घराबाहेर पडली होती. मात्र, त्यानंतर रात्री उशिरापर्यंत ती घरी परतली नाही. तरुणीच्या नातेवाईकांनी रात्रभर शोधाशोध करूनही तिचा शोध लागला नाही. तिच्या मामाने ८ नोव्हेंबर रोजी सकाळी पारोळा पोलीस ठाण्यात भाची हरवल्याची तक्रार दाखल केली. त्याच दिवशी सायंकाळी साडेपाच वाजता तिच्या मामाला एका तरुणीला विषबाधा झाली असल्याने तिच्यावर कुटीर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली. मामाने रुग्णालयात जाऊन खात्री केली असता ती त्यांचीच भाची होती.

तिची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी तिला पुढील उपचारासाठी धुळ्याला हलवण्याचा सल्ला दिला. म्हणून तिला तातडीने रुग्णवाहिकेतून धुळ्याला नेण्यात आले. धुळ्याला जात असताना तरुणी शुद्धीवर आली. आपले अपहरण करून तीन तरुणांनी सामूहिक अत्याचार केले. त्यानंतर एका महिलेच्या मदतीने बळजबरीने विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे तिने सांगितले. अत्याचार करणाऱ्या टोळी गावातील तीन तरुणांची नावेही तिने सांगितली. पीडित तरुणीला तिच्या नातेवाईकांनी धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले होते. पीडितेची प्रकृती चिंताजनक होती. तिला बोलताही येत नव्हते. त्यानंतर मंगळवारी पहाटेच्या सुमारास तिने वैद्यकीय महाविद्यालयात अखेरचा श्वास घेतला.

पोलिसांच्या प्राथमिक तपासात या घटनेबाबत माहिती समोर आली आहे. टोळी गावातील रहिवासी असलेले संशयित आरोपी शिवानंद शालिक पवार, पप्पू अशोक पाटील आणि अशोक वालजी पाटील या तिघांनी पीडितेचे अपहरण करत तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याचा संशय आहे. पीडितेने धुळे येथे उपचारासाठी नेत असताना नातेवाईकांना घटनेबाबत माहिती दिली. ७ नोव्हेंबर रोजी संशयित आरोपींनी पीडितेला गुंगीचे औषध देऊन तिचे पारोळा शहरातून अपहरण केले. त्यानंतर तिला एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे अज्ञातस्थळी नेऊन रात्रभर तिच्यावर सामूहिक अत्याचार केले. पीडितेने प्रतिकार केला असता, तिघा नराधमांसह एक अनोळखी महिलेने पीडितेला शिवीगाळ करत बळजबरीने विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मारहाणीत पीडितेच्या अंगावर गंभीर जखमा झाल्या होत्या.

दरम्यान, जोपर्यंत आरोपींना अटक होणार नाही, तोपर्यंत पीडितेवर अंत्यसंस्कार करणार नाही, असा पवित्रा पीडितेच्या कुटुंबीयांनी घेतला आहे. पारोळा शहरात तणावाचे वातावरण आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत