पालघर : पबजी खेळताना १६ वर्षांचा मुलगा इमारतीवरून पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शादान शेख असे या मुलाचे नाव आहे. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर सध्या पालघरच्या रिलीफ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
ही घटना काल (१५ मे) पालघरच्या शिरगाव येथे घडली. शादान शेख हा त्याच्या मित्रांसोबत शिरगाव येथील एका बांधकामाधीन इमारतीत PubG गेम खेळत होता. मात्र, तो या खेळात इतका मग्न झाला की आपण दुसऱ्या मजल्यावर आहोत हेदेखील तो विसरला आणि खेळत असताना अचानक दुसऱ्या मजल्यावरून खाली पडला. या अपघातात तो गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी पालघर रिलीफ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
या प्रकरणामुळे मोबाइल गेम खेळण्याच्या नादात तरुणाई किती हतबल झाली आहे हे पुन्हा समोर आले आहे. त्यांना गेम खेळताना कशाचेच भान राहत नाही, हे या घटनेने अधोरेखित केले आहे. त्यामुळे अशा तरुणांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.




