भारत आणि अमेरिकेसोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनने आपली नवीन हायटेक शस्त्रे जगासमोर आणली आहेत. या हायटेक शस्त्रांमध्ये आर्यन मॅनसारख्या एका खास सूटने जगाचे लक्ष वेधले आहे. या सूटमुळे चिनी सैन्याला मोठा फायदा होणार आहे.
भारतीय जवानांनी पॅन्गाँग त्सो सरोवराजवळ चिनी सैन्याच्या घुसखोरीचा डाव उधळून लावला. यामुळे चीनचा घुसखोरीचा डाव जगासमोर आला. त्यातच अमेरिका आणि चीनमध्ये देखील तणाव वाढत आहे. दक्षिण चीन समु्द्रात दोन्ही देशांचे नौदल आमनेसामने उभे ठाकले आहे. अशा परिस्थितीत चीनने आपली लष्करी सज्जता दाखवण्यासाठी व्हिडिओ ट्विट केला आहे. चीनने आपल्या जवानांसाठी एक एक्सयोस्केलेटन सूट विकसित केला आहे. या सूटमुळे सैनिकांची वजन वाहून नेण्याची क्षमता ५० किलोहून ८० किलो इतकी झाली आहे. चीनचे सरकारी वृत्तपत्र पीपल्स डेलीने याबाबत एक व्हिडिओ ट्विट केला आहे.
In video: Several types of military-use high-tech equipment, including exoskeleton robots and drones and driverless car for supply delivery, were unveiled in a recent logistic support drill carried out by PLA Army Logistics University. pic.twitter.com/p1mVyjTINH
— People’s Daily, China (@PDChina) September 1, 2020
पीपल्स डेलीने म्हटले की, चीनने सप्लाय ड्रोन विकसित केला आहे. या ड्रोनच्या माध्यमातून ३० किलो वजनापर्यंतच्या वस्तू कोणत्याही भागातून कोणत्याही ठिकाणी वेळेवर नेता येऊ शकतात. तसेच चीनने ३५० किलो वजन घेऊन जाण्यास सक्षम असणाऱ्या एका ड्रायव्हर लेस कारची निर्मिती केली आहे. ही कार एका वेळेस २० किमीपर्यंतचे अंतर कापू शकते.
पेंटागॉनने आपल्या वार्षिक अहवालात म्हटले की, भारताच्या शेजारी असलेल्या तीन देशांसह जवळपास १२ देशांमध्ये आपला लष्करी तळ उभारण्याचा प्रयत्न सुरु आहे. या अहवालानुसार, पाकिस्तान, श्रीलंका आणि म्यानमार या देशांसह थायलँड, सिंगापूर, इंडोनेशिया, संयुक्त अरब अमिरात, केनिया, सेशल्स, टांझानिया, अंकोला आणि ताजिकिस्तान या देशांमध्ये चीन आपला लष्करी तळ उभारण्याचा प्रयत्न करत आहे.
दरम्यान , चीनने अणवस्त्रांचा साठा दुप्पट करण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले आहेत. अमेरिकेवर हल्ला करण्यासाठी इतर देशातही चीन आपले लष्करी तळ उभारत आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या अहवालात ही बाब नमूद करण्यात आली आहे. जागतिक महासत्ता बनण्यासाठी चीनकडून ही पावले उचलली जात असल्याचे म्हटले जात आहे.




