बीजिंग : चीनमध्ये 3 ते 17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी सिनोव्हॅक बायोटेकच्या कोरोना लसीच्या आपत्कालीन वापराला मान्यता मिळाली आहे. तीन वर्षांच्या मुलांसाठी लस मंजूर करणारा चीन हा जगातील पहिला देश ठरला आहे. आतापर्यंत चीनमध्ये कोरोना लस फक्त 18 वर्षांवरील लोकांना दिली जात होती. अमेरिका, ब्रिटन, युरोप आणि इतर काही देशांमध्ये 12 ते 16 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलांना कोरोना लस देण्यास सुरुवात झाली आहे.
चीनची सरकारी कंपनी सिनोफर्म यांनीही किशोरवयीन मुलांसाठी लसीसाठी परवानगी मागितली आहे. सिनोफर्म लसीसाठी सिनोव्हॅकसारखेच तंत्रज्ञान वापरत आहे. कॅनसिनो बायोलॉजिक्स ही आणखी एक कंपनी 6 ते 17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी लस तयार करत आहे. त्याचे तंत्रज्ञान सिनोव्हॅकपेक्षा वेगळे आहे. त्यांच्या लसीच्या दुसर्या टप्प्याची चाचणी घेण्यात येत आहे.
सिनोव्हॅकने दुसर्या टप्प्यातील चाचण्यादेखील पूर्ण केल्या आहेत. चाचणी दरम्यान, सहभागींना लसीचे दोन नियमित डोस दिले गेले. यानंतर तिसरा बूस्टर डोस देण्यात आला. यादरम्यान, पूर्वीपेक्षा अँटीबॉडीजची पातळी 10 आणि 15 दिवसांनी 20 पट वाढल्याची दिसली. तथापि, कंपनीला अद्याप अँटीबॉडी कालावधीचा दीर्घकालीन आढावा घेणे आवश्यक आहे.
सिनोव्हॅक बायोटेकचे मुख्य कार्यकारी अधिकारी यिन वेइदोंग यांनी सांगितले की चाचणीच्या पहिल्या आणि दुसर्या टप्प्यात हजारो जणांनी सहभाग घेतला होता. प्रौढांप्रमाणे मुलांसाठी ही लस पूर्णपणे सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे आढळले. त्यामुळे तीन ते 17 वयोगटातील मुलांसाठी समान लस, समान डोस आणि समान प्रक्रिया वापरली जाऊ शकते.




