काही दिवसांपूर्वी चीनचं दूतावास बंद करण्याचे आदेश देणाऱ्या अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला आणखी एक दणका दिला. भारतापाठोपाठ अमेरिकेनंही चिनी अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरूवारी संध्याकाळी चिनी अॅप टिकटॉक आणि वी-चॅटवर ४५ दिवसांच्या आत बंदी घालण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली. ट्रम्प यांनी हा आदेश काढल्यानंतर चीननं यावर संताप व्यक्त केला आहे. यासंदर्भात रॉयटर्सने वृत्त दिलं आहे.
चिनी अॅपवर बंदी घालण्याचा अमेरिकेचा निर्णय आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या तत्त्वांच्या विरोधात आहे. आमची अमेरिकेला विनंती आहे की, त्यांनी त्यांची चूक सुधारावी, असं चीननं म्हटलं आहे.
अमेरिकन सिनेटनं कर्मचाऱ्यांच्या टिकटॉक वापरण्यावर बंदी घालणाऱ्या आदेशाला मान्यता दिली होती. “टिकटॉकसारख्या अविश्वासू अॅपद्वारे डेटा जमवला जाणं हे देशाच्या सुरक्षेविरोधात आहे. यामुळे चीन अमेरिकेतील फेडरल कर्मचारी आणि कंत्राटदारांच्या ठिकाणांचा मागोवा घेऊ शकते. इतकंच नाही तर कम्युनिस्ट पक्ष खासगी माहितीचा वापर करून धोका निर्माण करू शकतो आणि कॉर्पोरेट हेरगिरीदेखील करू शकतो,” असं ट्रम्प यांनी सांगितलं होतं.




