मुंबई : दिग्दर्शक सावन कुमार टाक यांचे गुरुवारी मुंबईत निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वी फुफ्फुसाच्या आजारामुळे त्यांना मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते सनम बेवफा, सौतन, साजन बिना सुहागन या लोकप्रिय बॉलिवूड चित्रपटांचे दिग्दर्शक आहेत.
ते त्यांच्या चार दशकांहून अधिक काळच्या कारकिर्दीत संजीव कुमार ते मेहमूद जूनियर उर्फ नईम सय्यद या कलाकारांना ब्रेक देण्यासाठी ओळखले जातात. जयपूर, राजस्थान येथे जन्मलेल्या सावन कुमार टाक यांना चित्रपट निर्मिती व्यतिरिक्त कविता आणि गाणी लिहिण्यात खूप रस होता, त्यांनी त्यांच्या चित्रपटांसाठी तसेच इतरांच्या चित्रपटांसाठी अनेक गाणी लिहिली.
2006 मध्ये आलेला सलमान खानचा चित्रपट सावन… द लव्ह सीझन हा चित्रपट सावन कुमार यांचा शेवटचे दिग्दर्शन होता. निर्माता म्हणून त्यांचा पहिला प्रकल्प 1967 मधील नौनिहाल हा चित्रपट होता, ज्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये विशेष उल्लेख झाला होता. त्यांच्या इतर चित्रपटांमध्ये हवा, अब क्या होगा, लैला, सौतेन, सनम बेवफा आणि दिल परदेसी हो गया यांचा समावेश आहे.




