मुंबई : अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. एका पत्रकाराने २०१९ मध्ये सलमान खान आणि त्याच्या बाॅडीगार्डविरुद्ध तक्रार दाखल केली होती. पत्रकाराला शिवीगाळ करून धमकावण्यात आल्याचे या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. मुंबईच्या अंधेरी मॅजिस्ट्रेट कोर्टाने याप्रकरणी सलमान खानला समन्स पाठवले आहे. समन्सनुसार, सलमान खानला 5 एप्रिल रोजी कोर्टात हजर राहावे लागणार आहे.
काय आहे प्रकरण?
पत्रकार अशोक पांडे यांनी २०१९ मध्ये सलमान खान आणि त्याच्या बाॅडीगार्डविरोधात तक्रार दाखल केली होती. अशोक पांडे आपल्या तक्रारीत म्हणाले की, २०१९ मध्ये ते कॅमेरामनसोबत कुठेतरी जात असताना त्यांना वाटेत सलमान खान सायकल चालवताना दिसला. अभिनेत्याच्या दोन्ही अंगरक्षकांची परवानगी घेतल्यानंतर अशोकने त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली. ही बाब सलमान खानला समजताच त्याने याला विरोध करण्यास सुरुवात केली. यानंतर सलमान खानच्या अंगरक्षकानेही त्याच्यावर हात उचलला. त्यानंतर सलमान खानने आपल्याला मारहाण करून फोन हिसकावून घेतला आणि धमकी दिल्याचंही या तक्रारीत म्हटलं आहे.




