'Ekda Kaya Jala' won the National Film Award for Best Marathi

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा : ‘एकदा काय झालं’ या चित्रपटाला सर्वोत्तम मराठीसाठी, तर ‘गोदावरी’ला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

देश मनोरंजन

नवी दिल्ली : ‘ एकदा काय झालं ’ या चित्रपटाला मराठी भाषेतील सर्वोत्तम चित्रपटाचा तर ‘गोदावरी’ या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनसाठी पुरस्कार जाहीर झाला. यासह नॉन फिचर फिल्म श्रेणीतील विशेष परीक्षक पुरस्कार ‘रेखा’या मराठी चित्रपटाला, तर सामाजिक विषयांवरील नॉन फिचर फिल्मसाठी ‘थ्री टू वन ’ या मराठी आणि हिंदी भाषेतील चित्रपटाला जाहीर झाला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

येथील नॅशनल मीडिया सेंटरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत वर्ष 2021 करिताच्या 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. याप्रसंगी माहिती प्रसारण मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव नीरजा शेखर, चित्रपट लेखन परीक्षक समितीचे अध्यक्ष यतिंद्र मिश्रा, नॉन फिचर फिल्म परीक्षक समितीचे अध्यक्ष वसंथ साई, चित्रपट परीक्षक समितीचे अध्यक्ष केतन मेहता यांनी विविध श्रेणीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटांची घोषणा केली.

फिचर फिल्ममध्ये विविध 32 श्रेणीत पुरस्कार जाहीर झालेले आहेत. यात विविध भाषेतील उत्कृष्ट चित्रपटांचाही समावेश आहे. नॉन फिचर फिल्ममध्ये विविध 24 श्रेणीमध्ये पुरस्कार जाहीर झाले.

‘एकदा काय झालं’ ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट
वर्ष 2021 मध्ये मराठी भाषेमधून ‘एकदा काय झालं’ हा चित्रपट सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला. वडील आणि मुलाच्या नात्यातील सुंदर आणि हळवा प्रवास चित्रपटातून दाखविण्यात आलेला आहे. या चित्रपटाला रजत कमल पुरस्कार जाहीर झाला असून निर्माता गजवंदना शो बॉक्स एलएलपी, तर दिग्दर्शक सलील कुलकर्णी हे आहेत.

‘गोदावरी (द होली वॉटर)’ या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार जाहीर झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन निखिल महाजन यांनी केले. पुरस्काराचे स्वरूप स्वर्ण कमळ, 2 लाख 50 हजार रोख असे आहे.

नॉन फिचर फिल्म श्रेणीतील सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ‘थ्री टू वन’ या हिंदी आणि मराठी दोन्ही भाषेत असणाऱ्या चित्रपटाला जाहीर झालेला आहे. हा पुरस्कार संयुक्तरीत्या ‘मिठू’ सोबत मिळालेला आहे. ‘थ्री टू वन’ या चित्रपटाची निर्मिती एफटीआयआय ची असून दिग्दर्शक हिमांशू प्रजापती आहेत. पुरस्काराचे स्वरुप रजत कमल आणि प्रत्येकी 50 हजार रूपये रोख आहे.

‘रेखा’ या मराठी नॉन फिचर फिल्मला विशेष परीक्षक श्रेणीतील पुरस्कार जाहीर झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शेखर बापू रणखांबे यांनी केले आहे. पुरस्काराचे स्वरूप रजत कमल आणि 1 लाख रूपये रोख आहे.

हिंदीमधील सर्वोत्कृष्ट चित्रपट ‘सरदार उधम’ हा ठरला. 2021 यावर्षीच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये दक्ष‍िणेतील चित्रपट अधिक दिसून आले असून उत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार ‘पुष्पा’ या तेलगु चित्रपटासाठी अल्लू अर्जूनला जाहीर झाला आहे. उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार 2 अभिनेत्रींना विभागून मिळणार आहे. ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटासाठी आलिया भट तर ‘मिमी’ या चित्रपटसाठी क्रिती सेनॉन यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. उत्कृष्ट सहअभिनेत्याचा पुरस्कार ‘मिमी’ या हिंदी सिनेमासाठी पंकज त्रिपाठी तर उत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार पल्लवी जोशी यांना ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटासाठी जाहीर झाला आहे.

सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ‘रॉकेट्री : द नांबी इफेक्ट’ अंतराळ वैज्ञानिकावर आधारित असणाऱ्या चित्रपटाला जाहीर झाला आहे. संपूर्ण मनोरंजन या श्रेणीतील पुरस्कार ‘आर आर आर’ या तेलुग चित्रपटाला जाहीर झालेला आहे. नर्गिस दत्त राष्ट्रीय एकात्मता या श्रेणीतील पुरस्कार ‘द कश्म‍ीर फाइल्स’ या हिंदी चित्रपटाला जाहीर झालेला आहे.

चित्रसृष्टीतील एकूण उत्कृष्ट कारकिर्दीसाठी देण्यात येणारा ‘दादासाहेब फाळके’ राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा नंतर करणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत