नवी दिल्ली : रॅपर एमसी कोड उर्फ आदित्य तिवारी बुधवारी नवी दिल्लीहून बेपत्ता झाला आहे. त्याने सोशल मीडियावर आपल्या शेवटच्या पोस्टमध्ये आत्महत्येचे संकेत दिले होते. गेल्या काही दिवसांपासून त्याचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे तो वादात सापडला होता, ज्यात त्याने हिंदू महाकाव्य महाभारतावर आक्षेपार्ह भाष्य केले होते. त्याच्या या टिप्पणीवर सोशल मीडियातून तीव्र विरोध झाला. लोक त्याला हिंदुफोबिक आणि स्त्रीविरोधी म्हणत होते. त्याला धमक्या देण्यात येत होत्या आणि त्याच्या अटकेची मागणीही केली जात होती. वाद वाढल्यानंतर कोडने माफी मागितली होती.
शेवटच्या पोस्टमध्ये कोडने काय लिहिले?
कोडने आपल्या शेवटच्या पोस्टमध्ये लिहिले आहे कि, “मी सतत होणाऱ्या छळामुळे कमकुवत झालो आहे. मला आशा होती की अखेर हे सर्व ठीक व शांत होईल. मी सध्या यमुना नदीच्या निर्जन पुलावर एकटा उभा आहे, जेथून मला माझ्या वेदनांना उत्तर देणाऱ्या लाटा दिसत आहेत.”
कोडने पुढे लिहिले, “मी फक्त दिलगिरी व्यक्त करू शकतो, कारण माझ्या स्वार्थी निर्णयामुळे अनेकांना त्रास झाला आहे. परंतु शेवटी मला तुम्हाला हि जाणीव करून द्यायची आहे की माझ्यासाठी शांतता आणि माझ्या आसपासच्या लोकांची सुरक्षा यांची हीच किंमत आहे. मी माझ्याशिवाय इतर कोणालाही दोष देत नाही. माझ्या अस्तित्वापासून मुक्त होणे हे शिक्षा म्हणून काम करेल, जी संपूर्ण देशाला हवी आहे. धन्यवाद.”
दरम्यान, कोडची ही पोस्ट वाचल्यानंतर त्याचे फॉलोअर्स दावा करत आहेत की ही एक सुसाइड नोट आहे. बर्याच लोकांनी त्याच्याविषयी चिंता व्यक्त केली आहे आणि दिल्ली पोलिसांना त्याच्या बेपत्ता होण्याबाबत चौकशी करण्याचे आवाहन केले आहे. यापूर्वी कोडने आपल्या व्हायरल पोस्टबद्दल दिलगिरी व्यक्त केली होती आणि सांगितले होते की मी किशोरवयात या सर्व गोष्टी करत होतो. परंतु, वाद निर्माण झाल्यामुळे बर्याच ब्रँडने त्याच्याशी केलेला करार रद्द केला होता. त्याच्याकडे कमाईचे कोणतेही साधन उरले नसल्याचा दावाही त्याने केला होता.




