Marathi Actor Vikram Gokhale passes away

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले काळाच्या पडद्याआड, प्रदीर्घ आजारानं पुण्यात निधन

पुणे मनोरंजन महाराष्ट्र

पुणे : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले. गेल्या १७ दिवसांपासून ते पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र आज २६ नोव्हेंबर रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं प्रदीर्घ आजारानं पुण्यात निधन झालं.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

आज संध्याकाळी वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. त्यांनी ‘तुझेच मी गीत गात आहे’ या स्टार प्रवाहवरील मालिकेत अखेरचे काम केले. तर नुकताच प्रदर्शित झालेला ‘गोदावरी’ हा त्यांचा अखेरचा सिनेमा ठरला.

अभिनेते विक्रम गोखले यांनी रंगभूमी, टीव्ही आणि सिनेमा ही तीनही माध्यमं गाजवले आहेत. रंगभूमीवर तर त्यांनी एक मोठा काळ गाजवला. ‘बॅरिस्टर’ नाटकाने विक्रम यांना प्रसिद्धीच्या शिखरावर नेलं. जवळपास ८ वर्ष त्यांनी हे नाटक केलं. परखड व्यक्तिमत्त्वासाठी गोखले विशेष ओळखले जायचे.

नाकारले पुरस्कार

विक्रम गोखले यांचा कोणत्याही पुरस्कारांवर विश्वास नव्हता. त्यांनी शासकीय पुरस्कारांनाही नकार दिला. एका मुलाखतीत त्यांनी आपलं मत मांडताना सांगितलं होतं की, ‘पुरस्कार सोहळे हे फक्त फॅशन झाली असून पैसे खिशात घेऊन पुरस्कार घेणारे मी पाहिले आहेत. अशा मांदियाळीत मला बसण्यात स्वारस्य नाही. कोणत्याही पुरस्काराने एखादा नट चांगला आहे की नाही हे सिद्ध होत नाही. त्याचं कामच बोलतं.’

सिनेसृष्टीशी संबंधित कुटुंबात जन्म
विक्रम गोखले यांचा जन्म चित्रपट कुटुंबात झाला. कुटुंबात अभिनयाची सुरुवात त्यांच्या आजीपासून झाली. विक्रम गोखले यांच्या आजी दुर्गाबाई कामत या भारतीय पडद्यावरच्या पहिल्या महिला अभिनेत्री होत्या. त्यांची आजी कमलाबाई गोखले यांनी भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिली महिला बालकलाकार म्हणून काम केले होते आणि त्यांचे वडील चंद्रकांत गोखले हे देखील मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते होते. कुटुंबाचा मार्ग अवलंबत विक्रम देखील सिनेसृष्टीत आले. मात्र, त्यांचे नाव नेहमीच रंगभूमीशी जोडले गेले. त्यांचा पहिला चित्रपट ‘परवाना’ 1970 साली प्रदर्शित झाला होता. यानंतर ते अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये दिसले.

या चित्रपटांमध्ये काम केले
विकम गोखले यांनी अनेक मराठी आणि बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले होते. 1990 मध्ये अमिताभ बच्चन यांच्या अग्निपथ आणि संजय लीला भन्साळी यांच्या हम दिल दे चुके सनम (1999) मध्ये ऐश्वर्या राय बच्चनच्या वडिलांच्या भूमिकेत ते दिसले होते. याशिवाय त्यांनी ‘भूल भुलैया’, ‘दिल से’, ‘दे दना दान’, ‘हिचकी’, ‘निकम्मा’ आणि ‘मिशन मंगल’ यांसारख्या बॉलीवूड हिट चित्रपटांमध्येही काम केले आहे.

टीव्हीवरही महत्त्वाच्या भूमिका केल्या
टीव्ही करिअरवर नजर टाकली तर त्यांनी ‘उडान’, ‘इंद्रधनुष’, ‘क्षितिज ये नहीं’, ‘संजीवनी’, ‘जीवन साथी’, ‘सिंहासन’, ‘मेरा नाम करेगी रोशन’, शिव महापुराण आणि अवरोध: मध्ये काम केले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत