आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेश येथे सामूहिक बलात्काराची घटना समोर आली आहे. रेल्वे स्थानकावर पती आणि मुलांच्या डोळ्यादेखत महिलेवर सामूहिक बलात्काराची संतापजनक घटना घडली आहे. प्रकाशम जिल्ह्यातील यारागोंडा भागातील एक महिला तिच्या पती आणि मुलांसह रात्री 11.30 वाजता रेपल्ले रेल्वे स्थानकावर ट्रेनमधून उतरली होती. मध्यरात्र असल्यामुळे त्यांना नागाईलंकाला जाण्यासाठी एकही बस मिळू शकली नाही, त्यामुळे रेल्वे स्थानक सुरक्षित असल्याचे समजून ते फलाटावरील बाकावर झोपले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री 1 वाजताच्या सुमारास दारूच्या नशेत असलेले तिघेजण त्यांच्याजवळ आले. त्यांनी आधी पीडितेकडे असलेले ७५० रुपये हिसकावले, त्यानंतर महिलेच्या पतीला बेदम मारहाण केली. त्यानंतर या नराधमांनी महिलेला तिचे केस धरून ओढले आणि तिच्यावर बलात्कार केला. घटनेच्या वेळी प्लॅटफॉर्मवर इतर दोन महिलाही होत्या. महिलेचा पती मदतीची याचना करत होता, मात्र त्यांनी मदत करण्यास नकार दिला. त्यानंतर त्याने स्टेशनबाहेर धाव घेतली आणि काही अंतरावर असलेल्या पोलिस चौकीत मदत मागण्यासाठी आला. मात्र, पोलिस रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मवर पोहोचेपर्यंत आरोपी फरार झाले होते.
पीडितेला तातडीने सामुदायिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून श्वानपथकाच्या मदतीने काही तासांतच तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. एक आरोपी विजयकृष्ण (२४), दुसरा आरोपी निखिल (२५), तर तिसरा आरोपी अल्पवयीन असून, त्याच्यावर यापूर्वीही चोरीचे गुन्हे दाखल आहेत. या तीन आरोपींनी महिलेवर सामूहिक बलात्कार केला. पीडित महिलेचे कुटुंब मजुरी करून उदरनिर्वाह करते. या घटनेमुळे महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.




