नांदेड : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या एका व्यक्तीने अतिशय भयंकर कृत्य केले आहे. वडिलांनीच आपल्या चार वर्षांच्या चिमुकल्याला पोत्यात बांधून गोदावरी नदीत फेकून दिले. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. ही घटना गुरुवारी समोर आली. याप्रकरणी कंधार पोलिसांनी आरोपी पित्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माधव देव्हारे असे आरोपी वडिलांचे नाव असून अभिषेक देव्हारे असे मृत मुलाचे नाव आहे. 28 मार्चला अभिषेक नेहमीप्रमाणे शाळेत गेला होता, मात्र बरच वेळ उलटूनही तो शाळेतून घरी न परतल्याने त्याची आई व कुटुंबीयांनी 29 मार्च रोजी कंधार पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरु केला. दरम्यान, माधव चौकशीत नीट उत्तरे देत नसल्याने पोलिसांना त्याचा संशय आला. त्यानंतर पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी माधव देव्हारे याला दोन मुले आहेत. तो दारूच्या नशेत नेहमी पत्नीसोबत भांडण होत असे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तो नेहमी लहान मुलगा माझा नाही, असे म्हणायचा. 28 मार्चला त्याने मुलगा अभिषेक याला गोणीत बांधून नायगाव तालुक्यातील राहेर येथील गोदावरी नदीच्या पुलावरून फेकून दिले. 30 मार्च रोजी धर्माबाद तालुक्यातील येळापूर शिवारात गोदावरी नदीच्या काठावर अभिषेकचा मृतदेह तरंगताना आढळून आला आहे. पोलिसांनी तपास करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. याप्रकरणी आरोपी माधव देव्हारेविरुद्ध कंधार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरु आहे.




