पुणे : पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील नाणेकरवाडी येथे रविवारी दुपारी एका 17 वर्षीय मुलीची गळा आवळून हत्या करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलीचे नाव प्रीती कुमारी संतोष साहा आहे. ती तिच्या घरी एकटीच असताना आरोपीने तिची हत्या केली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिनगारे यांनीही घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर पंचनामा करून प्रितीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. याप्रकरणी चाकण पोलिसांनी रात्री उशिरा आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. आरोपी आणि मृत मुलगी दोघेही बिहारमधील एकाच गावातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस पुढील तपास करत आहेत.




