लखनौ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमधील सायरापूर पोलीस स्टेशन परिसरात एका 1 वर्षाच्या निष्पाप मुलीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलाला अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, अल्पवयीन मुलाने फिल्मी स्टाईलने बाळाची हत्या करून तिला शाळेतील पाण्याच्या टाकीत टाकले. मुलीचा मृतदेह वर येऊ नये यासाठी गुन्हेगार अल्पवयीन मुलाने तिच्या पायाला वीट बांधली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, सैरापूर पोलीस स्टेशन हद्दीतील जुगौर गावातील सुशील पांडे यांची 1 वर्षाची मुलगी घरातून बेपत्ता झाली होती. सुशील यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर मुलीचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम राबविण्यात आली. यावेळी पोलिसांना समजले की दोन अल्पवयीन मुले मुलीला शाळेत घेऊन गेले आहेत. पोलिसांनी शाळेत झडती घेतली असता शौचालयातील पाण्याच्या टाकीत मुलीचा मृतदेह पडलेला आढळून आला. मुलीच्या पायाला वीट बांधलेली होती आणि तिच्या अंगावर कपडे नव्हते.
पोलिसांनी तात्काळ पाण्याच्या टाकीतून मुलीचा मृतदेह बाहेर काढला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाच्या काही तासांच्या तपासानंतर प्रकरण उघडकीस आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 वर्षीय अल्पवयीन मुलाने या निष्पाप मुलीची हत्या केली होती. अल्पवयीन आरोपी अमली पदार्थांचे व्यसन करायचा आणि अनेकदा लोकांना त्रास द्यायचा. लोकांनी अनेकवेळा घरच्यांकडे तक्रारही केली आहे. मुलीच्या हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपमानाचा बदला घेण्यासाठी अल्पवयीन गुन्हेगाराने मुलीची हत्या केली. सध्या त्याची चौकशी सुरू असून त्याला लवकरच बाल न्याय मंडळासमोर (Juvenile Justice Board) हजर करण्यात येणार आहे.




