नागपूर : नारायणराव दाभाडकर यांचं कोरोनामुळे राहत्या घरी निधन झालं. एका तरुण कोरोना रुग्णासाठी त्यांनी बेड सोडला अशी बातमी आल्यानंतर त्यांच्याबद्दल सोशल मीडियावर खूप चर्चा सुरु झाली आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी ट्विट करत नारायणराव दाभाडकर यांनी दुसऱ्या रुग्णासाठी बेड नाकारला अन् मृत्यूला कवटाळलं अशी माहिती पोस्टमध्ये दिली. यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी नारायण दाभाडकर यांचा फोटो शेअर करत कौतुक केलं तर अनेकांनी टीका केल्या. तर जाणून घ्या याबाबत त्यांची मुलगी आणि इंदिरा गांधी रुग्णालयाचे कर्मचारी काय म्हणतात…
इंदिरा गांधी रुग्णालयाच्या कोव्हिड विभागाचे प्रमुख अजय हरदास वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले कि, 22 एप्रिल 2021 रोजी आमच्या रुग्णालयाच्या कॅज्युअल्टी विभागात नारायण दाभाडकर यांना आणण्यात आले. आम्ही त्यांच्यावर लागलीच उपचार सुरू केले. पण नंतर उपचारादरम्यान ते मला घरीच जायचं आहे. मला हॉस्पिटल मध्ये ठेऊ नका, असा आग्रह करु लागले. ते घरी जाण्याचा आग्रह का करत होते, याची आम्हाला माहिती मिळाली नाही. 22 एप्रिल रोजी आमच्या रुग्णालयात कोरोना पेशंट्सची खूप गर्दी होती. आमचे महापालिकेचे रुग्णालय असल्यामुळे आम्ही कुणालाही परत पाठवत नाही. त्या दिवशी तर आम्ही खुर्चीवर बसवूनही अनेक रुग्णांना ऑक्सिजन सपोर्ट दिला होता.
नारायण दाभाडकर कॅज्युअल्टीमध्ये काही वेळ उपचार घेत असताना त्यांच्या ऑक्सिजन लेव्हलमध्ये सुधारणा होत होती. आम्ही त्यांना कोव्हिड वॉर्डात हलवणार होतो. पण त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना घरी नेण्याची परवानगी मागितली. नंतर ते त्यांना घरी घेऊन गेले. घरी नेल्यानंतर त्यांची प्रकृती आणखी खालावली. तेव्हा त्यांना व्हेंटिलेटर सपोर्ट देण्याची गरज होती. आमच्या रुग्णालयात व्हेंटिलेटर सोय नाही. दाभाडकर कुटुंबीयांनी त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर सपोर्ट द्यायला हवा होता. पण नारायण दाभाडकर आता आपल्यात नाही, याबद्दल आम्हाला खेद आहे, असं हरदास यांनी सांगितलं.
आसावरी कोठीवान (नारायण दाभाडकर यांची मुलगी) या घटनेबद्दल म्हणाल्या कि, “आमच्या संपूर्ण कुटुंबाला 16 एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाली होती. आमच्या संपर्कात आल्याने आम्ही बाबांचीही कोरोना चाचणी केली. त्यांचा अहवाल 19 एप्रिल रोजी आला. आम्हीच घरीच त्यांच्यावर कोरोनावरील उपचार सुरू ठेवले. 22 एप्रिल रोजी बाबांची ऑक्सिजन लेव्हल अचानक खाली गेल्याने आम्ही घाबरलो. बाबांना ऑक्सिजन बेडची आवश्यकता होती. बऱ्याच प्रयत्नानंतर आम्हाला नागपूर महानगर पालिकेच्या गांधीनगरातील इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये बेड मिळाला. बाबांची तब्येत नाजूक असतानाही काही तासांतच त्यांना परत घरी आणण्यात आले. बाबांनी घरी येण्याचा आग्रह का धरला? याविषयी विचारलं तेव्हा त्यांनी सांगितले की, हॉस्पिटलमध्ये एक महिला तिच्या चाळीशीतल्या नवऱ्याला ऑक्सिजन बेड मिळण्यासाठी आकांत करताना त्यांनी पाहिलं. त्यांनी तेथे एका डॉक्टरांना सांगितलं की, मी माझं आयुष्य जगून पूर्ण केलं आहे. हा तरुण जगला पाहिजे. याकरिता माझा ऑक्सिजन बेड त्याला द्या. अत्यवस्थ अवस्थेत बाबा घरी आणखी काही तासच राहिले, माझ्या हातचे एक दोन घासच मी त्यांना भरवू शकले. त्यांचे हात पाय सुन्न झाले होते, नखे काळसर होत होते. अशातच त्यांनी घरी प्राण सोडले.”
नागपूर महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी मनिष सोनी यांच्याशी बोलल्यानंतर ते म्हणाले कि, 22 एप्रिल 2021 रोजी मनपाच्या गांधीनगर येथील इंदिरा गांधी रुग्णालयात नारायण दाभाडकर यांना कोव्हिडने ग्रासल्यामुळे दाखल करण्यात आलं. काही तास त्यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी घरी नेऊन उपचार करण्याची विनंती केली. आरोग्य यंत्रणेमध्ये म्हणजेच वैद्यकीय सल्ल्यानुसार रुग्णालयातून सुट्टी देण्यात येऊ शकते ही सोय आहे. याचनुसार नारायण दाभाडकर यांना आम्ही रुग्णालयातून सुट्टी दिली होती. इंदिरा गांधी रुग्णालयात संबधित नोंदी बघता हेच पुढे येतं.
शिवराज सिंग चौहान यांचं ट्विट काय?
शिवराज सिंग चौहान यांनी नारायण दाभाडकर यांचा फोटो पोस्ट केला असून लिहिलं आहे की, मी ८५ वर्षाचा झालो आहे. संपूर्ण आयुष्य पाहिलं आहे, पण जर त्या महिलेच्या पतीचा मृत्यू झाला तर तिची मुलं अनाथ होतील. यामुळे त्या व्यक्तीचे प्राण वाचवणं माझं कर्तव्य आहे” असं सांगत करोनाबाधित आरएसएस स्वयंसेवक नारायणजींनी आपला बेड त्या रुग्णाला दिला. दुसऱ्या व्यक्तीच्या जीवाचं रक्षण करताना नारायणजी तीन दिवसांमध्ये जग सोडून गेले. समाज आणि राष्ट्राचे खरे सेवक असाच त्याग करतात. आपल्या सेवेला सलाम!, तुम्ही समाजासाठी प्रेरणादायी आहात.
“मैं 85 वर्ष का हो चुका हूँ, जीवन देख लिया है, लेकिन अगर उस स्त्री का पति मर गया तो बच्चे अनाथ हो जायेंगे, इसलिए मेरा कर्तव्य है कि मैं उस व्यक्ति के प्राण बचाऊं।” ऐसा कह कर कोरोना पीडित @RSSorg के स्वयंसेवक श्री नारायण जी ने अपना बेड उस मरीज़ को दे दिया। pic.twitter.com/gxmmcGtBiE
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) April 27, 2021
पेशंट असा बेड दुसऱ्याला देऊ शकतो का?
नागपूर महानगर पालिकेच्या म्हणण्यानुसार, एखाद्या रुग्णाने रुग्णालयातील बेड रिकामा केल्यावर तो दुसऱ्या कुणाला द्यायचा याचा निर्णय पेशंट घेऊ शकत नाही. रुग्णाची स्थिती आणि वेटिंगवर असलेल्या रुग्णांच्या क्रमानुसारच त्यांना बेड दिला जातो. शिवाय सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रसाराच्या काळात हॉस्पिटलमध्ये बेड्स मिळणे अवघड झालं आहे, कारण उपलब्ध क्षमतेपेक्षा कितीतरी जास्त पेंशंट्स सध्या शहरात आहेत.
‘त्या’ तरुण रुग्णाला बेड मिळाला का?
दाभाडकर यांनी ज्या चाळीशीतल्या रुग्णासाठी रुग्णालयातून मला घरी घेऊन जा, असं सांगितल्याचा दावा त्यांच्या मुलीने केला आहे. त्या रुग्णाची ओळख पटू शकली नाही. मात्र, ज्या तरुणासाठी बेडचा त्याग केला, त्याला शेवटपर्यंत तो बेड मिळाला की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.




