मुंबई : व्हॉट्स अॅपवर कुणीही काहीही पोस्ट केले वा वादग्रस्त मेसेज टाकले तर त्या मेसेजप्रकरणी व्हॉट्स अॅप ग्रुपच्या अॅडमिनला जबाबदार धरता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. या निर्णयामुळे ग्रुप अॅडमिनला मोठा दिलासा मिळणार आहे. संबंधित मेसेजमागे ग्रुपचा सामाईक हेतू नसेल तर अॅडमिनला दोष देता येणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती झेड. ए. हक आणि न्यायमूर्ती अमित बी. बोरकर यांनी हा निकाल दिला आहे.
जुलै 2016 मध्ये व्हॉट्स अॅप ग्रुपच्या 33 वर्षीय अॅडमिनविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ग्रुपमधील एका सदस्याने ग्रुपच्या महिला सदस्याविरोधात असभ्य, अश्लिल भाषेचा वापर केला होता. त्याप्रकरणी ग्रुप अॅडमिनलाही जबाबदार धरण्यात आले होते. तसेच या सदस्यावर कारवाई न केल्याप्रकरणी ग्रुप अॅडमिनविरोधात गोंदियाच्या महानगर न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे आरोपपत्रही दाखल करण्यात आले होते. उच्च न्यायालयाने अॅडमिनविरोधातील गुन्हा रद्दबातल ठरवून मोठा दिलासा दिला. याचवेळी न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले.
या प्रकरणात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने व्हॉट्स अॅप ग्रुपच्या अॅडमिनला मोठा दिलासा दिला आहे. तसेच न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की व्हॉट्स अॅप ग्रुपमधील एका सदस्याने महिला सदस्याविषयी असभ्य भाषेचा वापर केला आहे. मात्र यामागे कुठलाही सामाईक हेतू सिद्ध होत नाही. ग्रुप सदस्याच्या मताचा ग्रुप अॅडमिनशी कुठलाही संबंध दिसत नाही. अशा प्रकारे सामाईक हेतू नसताना आक्षेपार्ह मेसेजप्रकरणी व्हॉट्स अॅप ग्रुप अॅडमिनला जबाबदार धरता येणार नाही. व्यक्ती ज्यावेळी एखादा व्हॉट्स अॅप ग्रुप तयार करते, त्यावेळी त्या ग्रुपमध्ये जोडल्या जाणाऱ्या सदस्यांच्या गुन्हेगारी कृतींची अॅडमिनला आधीच कल्पना असू शकत नाही.




