पुणे : कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढविणे, एका बाधित व्यक्तींमागे ३० जणांचा शोध घेणे आणि लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी २४ तास लसीकरण सुरू करणे, अशा शिफारसी कोरोना कृती दलाने राज्य सरकारला केल्या आहेत.
उन्हाळ्यात कोरोनाचा संसर्गाची तीव्रता अधिक होती आणि थंडीत कमी झाली. आता राज्यातील रुग्णसंख्या वाढत असून, येत्या उन्हाळ्यातही संसर्गाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस काटेकोरपणे नियंत्रण केले नाही तर पुन्हा सप्टेंबर २०२० प्रमाणे स्थिती उद्भवू शकेल. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपायांवर जोमाने भर देणे आवश्यक असल्याचे मत मृत्यू विश्लेषण समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी व्यक्त केले.
कोरोना कृती दलाचे सदस्य डॉक्टर शशांक जोशी म्हटले कि, रुग्णसंख्या वाढली तरी घाबरून जाऊ नये, चाचण्या वाढविल्याने रुग्णसंख्या अधिक वाढलेली दिसते. त्यामुळे दुसऱ्या लाटेबाबत साशंकता आहे. मुंबई महानगर प्रदेशात चाचण्यांची संख्या वाढविलेली आहे आणि बाधितांचे प्रमाण पाच टक्के आहे. परंतु ठाण्यात काही ठिकाणी संसर्गाचा अधिक प्रसार होत असल्याचे दिसून येते. विदर्भ आणि मराठवाडय़ात विशेषत: अकोला आणि अमरावती या भागांत संसर्ग तीव्रतेने पसरत आहे. वातावरण बदलाचाही एक परिणाम म्हणून रुग्णसंख्या वाढत आहे.
डॉक्टर जोशी पुढे म्हटले कि, रुग्णसंख्या नियंत्रणासाठी चाचण्यांची संख्या वाढविणे गरजेचे आहे. मुंबईत सध्या दरदिवशी सुमारे २० हजार चाचण्या होत आहेत. तसेच प्रत्येक बाधित व्यक्तीमागे ३० संपर्कातील व्यक्तींचा शोध घेणे आवश्यक आहे. संसर्गाचा प्रसार होत असणारे क्षेत्र प्रतिबंधित करायला हवे अशा सूचना कृती दलाने सोमवारी झालेल्या बैठकीत राज्याला दिल्या आहेत.
केंद्रीय आरोग्य विभागाने तपासण्या करून अकोला आणि अमरावतीमध्ये कोरोनाचे उत्परिवर्तन (नवीन स्ट्रेन) आढळले नसल्याचे जाहीर केले असले तरी ज्या रितीने रुग्णसंख्या वाढत आहे, ते लक्षात घेता उत्परिवर्तित विषाणू असल्याची शक्यता अजूनही नाकारता येणार नाही, असे डॉ. जोशी यांनी स्पष्ट केले.




