मुंबई : सेन्सेक्सने आज विक्रमी पातळी गाठली आहे. आज सोमवारी सकाळी बाजार सुरु होताच सेन्सेक्स ५०० अंकांनी वधारला आणि पहिल्यांदाच ५२००० अंकांच्या पातळीवर गेला आहे. या तेजीत गुंतवणूकदारांची मालमत्ता किमान एक लाख कोटींनी वाढली आहे. आजच्या सत्रात बँका, वित्त संस्था, एफएमसीजी, ऑटो या शेअरला चांगली मागणी आहे. सेन्सेक्सने सकाळी ९.३० वाजता ५२०४०.०० अंकांची विक्रमी पातळी गाठली. निफ्टी १३२ अंकांची झेप घेत १५३०० अंकांपुढे गेला आहे.
अमेरिकेकडून आर्थिक पॅकेज वाढवण्याची शक्यता आहे. तसेच जगभरात कोरोना लसीकरण मोहीम वेगाने सुरु आहे. कच्च्या तेलाचा भाव देखील झपाट्याने वाढत असून इंधन मागणीत सुधारणा झाली आहे. हे सर्व अर्थव्यवस्था सावरत असल्याचे संकेत असून त्यामुळेच गुंतवणूकदारांनी जोरदार गुंतवणूक केली असल्याचे शेअर बाजार विश्लेषकांचे म्हणणे आहे.
आजच्या सत्रात सेन्सेक्समधील ३० पैकी २५ शेअर तेजीत आहेत. त्यात इंडसइंड बँक, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी, कोटक बँक, मारुती, एसबीआय, ऍक्सिस बँक, टायटन, अल्ट्राटेक सिमेंट, एचयूएल या शेअरमध्ये वाढ झाली आहे. तर एचसीएल टेक, टीसीएस, महिंद्रा अँड महिंद्रा, टेक महिंद्रा आणि ओएनजीसी या शेअरमध्ये घसरण झाली आहे.




