मुंबई : राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले पिक वाहून गेले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत या आर्थिक मदतेची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, हे १०,००० कोटी रुपये विविध कारणआंसाठी असणार आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, या आपत्तीच्या निमित्ताने आम्ही शेतकऱ्यांना शब्द दिला होता की, आम्ही तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. म्हणून या सगळ्याचा विचार करुन १०,००० कोटी रुपये देण्याचं आम्ही निश्चित केलं आहे. तसेच दिवाळीपूर्वी सर्वांपर्यंत मदत पोहोचवणार आहोत.
- अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटींचं पॅकेज
- रस्ते आणि पुलांसाठी २ हजार ६३५ कोटी रुपये
- पाणी पुरवठ्यासाठी १ हजार कोटी रुपये
- जिरायत, बागायतीसाठी प्रति हेक्टरी १० हजार रुपये
- फळपिकांच्या नुकसानीसाठी हेक्टरी २५ हजार रुपये जाहीर
- महावितरण ऊर्जा – २३९ कोटी रुपये
- जलसंपदा – १०२ कोटी रुपये
- मृत व्यक्तींच्या वारसांना, मयत पशुधनासाठी, घरपडझडीसाठी वाढीव मदत देण्यात येईल.
जिरायत, बागायत जमिनीसाठी ६,८०० रुपये प्रति हेक्टर ही केंद्राची मदत अपुरी आहे. त्यामुळे आम्ही ती दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी १०,००० रुपये देणार आहोत अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.




