दाक्षिणात्य अभिनेता टोविनो थॉमस ‘काला’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान जखमी झाला आहे. चित्रपटातील एका स्टंटचं शूटिंग सुरु असताना त्याच्या छातीला दुखापत झाली. परिणामी अंतर्गत रक्तस्त्राव सुरु होऊन तो बेशुद्ध पडला. सध्या कोचीमधील रेनाई मेडिसीटी या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
टोविनोची प्रकृती सध्या स्थिर आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने त्याच्यावर उपचार सुरु आहेत. स्टंट करताना त्याच्या पोटावर आणि छातीवर जबरदस्त मार बसला. दरम्यान त्याच्या फुफ्फुसांवर जखम होऊन अंतर्गत रक्तस्त्राव सुरु झाला. त्यामुळे टोविनला श्वास घेताना थोडा त्रास होत आहे. सध्या अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, लवकरच त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल.




