पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपीने स्वतःची ओळख इस्रोतील शास्त्रज्ञ म्हणून करून दिली होती.
पीडित महिला हिंजवडी येथील एका नामांकित आयटी कंपनीत कार्यरत आहे. आरोपीची ओळख जयेश पाटील उर्फ आदर्श म्हात्रे अशी असून तो अलिबाग येथील रहिवासी असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर २०२४ मध्ये या तरुणीने एका वैवाहिक वेबसाइटवर प्रोफाइल तयार केले. त्याच काळात आरोपीने तिच्याशी संपर्क साधला. संवाद वाढवत त्याने प्रत्यक्ष भेट घेतली आणि स्वतः इस्रोमध्ये कार्यरत असल्याचा दावा केला. हळूहळू त्याने विश्वास संपादन करत एकत्र राहण्याचे, मालमत्ता खरेदी करण्याचे आणि भविष्याची स्वप्ने दाखवली. नोव्हेंबर २०२४ ते जानेवारी २०२५ दरम्यान, विविध कारणे सांगत त्याने पैशांची मागणी केली. पीडितेने टप्प्याटप्प्याने एकूण ४२.६४ लाख रुपये त्याच्या खात्यात जमा केले.
दरम्यान, आरोपी इस्रोमध्ये नोकरी करत नसल्याची माहिती मिळाल्यानंतर पीडितेला संशय आला. तिने तत्काळ ऑनलाइन तक्रार नोंदवली. वाकड पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. सायबर यंत्रणांच्या मदतीने १६.६५ लाख रुपये गोठवून जप्त करण्यात आले. उर्वरित अंदाजे २७ लाख रुपयांचा शोध सुरू आहे.
प्राथमिक चौकशीत आरोपीने अशाच प्रकारे सुशिक्षित महिलांना लक्ष्य केल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वीही नवी मुंबई पोलिसांनी आरोपीला फसवणुकीच्या प्रकरणात अटक केली होती. तपासात आरोपीने गोव्यातील कॅसिनोसह विलासी जीवनासाठी ही रक्कम खर्च केल्याचेही समोर आले आहे.
सध्या आरोपी ४ मार्चपर्यंत नवी मुंबई पोलिसांच्या कोठडीत असून, रिमांड संपल्यानंतर वाकड पोलिस त्याला पुढील चौकशीसाठी ताब्यात घेणार आहेत.
मॅट्रिमोनियल साईट आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वाढत्या फसवणुकीच्या घटनांमुळे सायबर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तज्ज्ञांच्या मते, आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी ओळख आणि नोकरीची खातरजमा करणे अत्यावश्यक आहे.




