मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सध्या मुंबईतील आझाद मैदानात सुरू आहे. त्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई महापालिका मुख्यालय परिसर, चर्चगेट स्थानक, हुतात्मा चौक आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलक जमले असून दक्षिण मुंबईतील अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली आहे. याच पार्श्वभूमीवर दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर मुंबई हायकोर्टात आज तातडीची सुनावणी झाली.
सुनावणीदरम्यान दोन्ही बाजूंनी विस्तृत युक्तिवाद पार पडल्यानंतर हायकोर्टाने काही महत्त्वाचे निर्देश दिले. आंदोलकांनी आझाद मैदानाव्यतिरिक्त सर्व रस्ते आणि सार्वजनिक जागा मोकळ्या कराव्यात, असा आदेश न्यायालयाने दिला आहे.
हायकोर्टाचे स्पष्ट निर्देश :
- “प्रथमदर्शनी आंदोलनासाठी मिळालेल्या परवानगीच्या अटींचे उल्लंघन झाले आहे. मनोज जरांगे पाटील, विरेंद्र पवार आणि अन्य प्रतिवादींनी आझाद मैदानाव्यतिरिक्त ठिकाणी जमाव केला आहे. तसेच सध्या आझाद मैदानावरील आंदोलनासाठीही कोणतीही वैध परवानगी नाही. त्यामुळे २६ ऑगस्ट २०२५ रोजीच्या अंतरिम आदेशानुसार व सार्वजनिक सभा-आंदोलन २०२५ नियमावलीनुसार सरकारने योग्य ती कार्यवाही करावी,” असे निर्देश न्यायालयाने दिले.
- “मुंबईतील जनजीवन ठप्प होऊ नये, विशेषत: सध्या सुरू असलेल्या गणेशोत्सवात नागरिकांना अडचणी येऊ नयेत म्हणून आंदोलकांनी आझाद मैदानाव्यतिरिक्त जागा उद्या (२ सप्टेंबर) दुपारपर्यंत मोकळ्या कराव्यात. उद्या सायंकाळी ४ वाजेपर्यंत रस्त्यांवरील सर्व गर्दी हटवावी,” असा आदेश न्यायालयाने दिला.
- “राज्य सरकार आणि पोलिसांनी खबरदारी घ्यावी की, आणखी आंदोलक मुंबईत दाखल होणार नाहीत,” असेही कोर्टाने स्पष्ट केले.
वैद्यकीय सोयीबाबतही आदेश
हायकोर्टाने राज्य सरकारला आदेश दिला की, जर मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली तर त्यांना तातडीने आवश्यक वैद्यकीय उपचार उपलब्ध करून द्यावेत.




