मुंबई : अभिनेता एजाज खाननं नुकतीच विधानसभा निवढणूक लढवली होती. परंतु आता एजाज खानच्या पत्नीला पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणात ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे अभिनेता एजाज खान यापूर्वी अनेकदा ड्रग्ज केसमुळं वादात अडकलेला आहे. एजाज खानची पत्नी फेलॉन गुलीवाला हिला पोलिसांनी अटक केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
महिन्यापूर्वी एजाजच्या अंधेरीतल्या ऑफिसमध्ये एका कर्मचाऱ्याच्या नावावर आलेल्या कुरिअरमध्ये ड्रग्ज असल्याचं समोर आलं होतं आणि याप्रकरणी त्याला अटक झाली होती. आता एजाज याची पत्नी फेलॉनला अटक करण्यात आल्याचं समोर आलं आहे. कस्टम विभागानं एजाजची पत्नी फेलॉनच्या घरी छापा टाकल्यानंतर ड्रग्ज सापडल्यानं तिच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. फेलॉनच्या घरी वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. ८ ऑक्टोबर रोजी एका ड्रग्ज प्रकरणात फेलॉनचं नाव समोर आलं होतं. त्यानुसार तपास केल्यानंतर पोलिसांच्या हाती महत्वाचे पुरावे लागले.
दरम्यान, एजाजच्या ऑफिसमधल्या ज्या कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली होती, त्याने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. एजाजचे पार्सल हे पियून सुरज गौड या कर्मचाऱ्याच्या नावावर याचचं, त्यामुळे याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी एजाज आणि फेलॉनच्या घरावर छापा टाकला. या छाप्यात १३६ ग्रॅम चरस सापडलं आहे. ३३ ग्रॅम एमडी ड्रग्जचे रिकामे पॅकेट्सही जप्त कऱण्यात आले आहेत. २८ ग्राम एमडी गोळ्याही जप्त करण्यात आल्या आहेत. तर तब्बल ११ लाखांची रोकडही जप्त करण्यात आली आहे. यापूर्वी अनेकदा एजाजला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली आहे. यापूर्वी ड्रग्ज प्रकरणात तो २६ महिने तुरुंगात होता.




