जालना : जालन्यात ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाला आहे. अंबडपासून १० किमीवर वडीगोद्री रोडवरील शहापूरजवळ हा अपघात झाला आहे. या अपघातात पाच जण जागीच ठार झाले असून १४ जण जखमी झाले आहेत. गेवराईहून अंबडकडे जाणाऱ्या बसने आयशर ट्रकला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती होती की बस आणि आयशर ट्रकचा चक्काचूर झाला आहे.
जालना आणि वडीगोद्रीदरम्यान शहापूर गाव असून तिथे हा अपघात झाला. गेवराईकडून बस अंबडकडे जात असताना जालन्यावरुन समोरुन येणारा मोसंबीने भरलेला आयशर ट्रक यांची समोरासमोर धडक झाली आहे. बसमध्ये एकूण २० ते ३० प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला असून १४ जण जखमी झाले आहे. जखमींना अंबड शहरातील प्राथमिक आरोग्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची भीती प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केली आहे.




