मध्य प्रदेश : अल्पवयीन मुलींवरीलअत्याचाराच्या घटनांनी संपूर्ण देश हादरला आहे. मध्यप्रदेशमधून अशीच एक संतापजनक घटना समोर आली आहे. ८ वर्षाच्या चिमुकलीवर एका तरुणाने रुग्णालयाच्या टॉयलेटमध्ये बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चिमुकली आपल्या वडील आणि आजीसोबत त्यांच्या नातेवाईकाला भेटण्यासाठी रुग्णालयात आली असताना या नराधमाने तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव सुरेश वर्मा आहे. तो आपल्या पत्नीला प्रसूतीसाठी बायोरा शासकीय रुग्णालयात घेऊन आला होता. त्याच्या पत्नीला प्रसूतीसाठी आत नेले होते. यावेळी ८ वर्षांची चिमुकली आपले वडील आणि आजीसोबत आली होती. वडील आणि आजी नातेवाईकाला पाहण्यासाठी आत गेल्यानंतर ती बाहेर एकटीच बसली होती. सुरेशने तिला बघितले आणि फूस लावत आपल्या जाळ्यात अडकवले. तो तिला टॉयलेट मध्ये घेऊन गेला आणि तेथे तिच्यावर अतिप्रसंग केला.
दरम्यान, चिमुकलीच्या किंकाळ्याच्या आवाजामुळे आजूबाजूचे लोक आणि सुरक्षा रक्षक तात्काळ टॉयलेटमध्ये पोहोचले. चिमुकलीला त्या अवस्थेत पाहून त्यांचा संताप अनावर झाला, त्यांनी सुरेशला बेदम मारले. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपी सुऱेशला ताब्यात घेतले. आरोपीविरोधात भारतीय न्यायसंहिता आणि पॉक्सो कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.




