ठाणे : एका इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून ३ वर्षाच्या चिमुकलीवर कुत्रा पडल्यामुळे मुलीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे, ठाण्यातील मुंब्रा परिसरात हा धक्कादायक अपघात घडला आहे. यामध्ये कुत्रा जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंब्रा येथील अमृत नगर परिसरात असलेल्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून अचानक एक कुत्रा निष्पाप मुलीच्या अंगावर पडला. मंगळवारी दुपारी ही मुलगी तिच्या आईसोबत इमारतीखालून जात होती, यावेळी हा अपघात झाला. यामध्ये मुलगी पूर्णपणे बेशुद्ध झाली. तिची आई तात्काळ मुलीला रुग्णालयात घेऊन गेली. मात्र, तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच एका प्राणीप्रेमी महिलेने जखमी कुत्र्याला तातडीने उचलून रुग्णालयात नेले. घटनेची माहिती मिळताच मुंब्रा पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत. जैद सय्यद नावाच्या व्यक्तीने चिराग मॅन्शन इमारतीच्या टेरेसवर हा कुत्रा पाळला होता, अशी माहिती मिळाली आहे.




