मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा जम्मू काश्मीर येथील कुपवाडा येथे स्थापित करण्यात येणार आहे. मंत्री मुनगंटीवार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा २२६२ किलोमीटरचा टप्पा पार करून कुपवाडा पर्यंतचा हा प्रवास होणार आहे. राज्याची संस्कृती, वीरतेचा गौरव जगभर पोहोचवण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखे आपण राज्यात आणत आहोत. लोकवर्गणीतून लंडन येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. त्यासाठी तेथील स्थानिक मराठी बांधवांना आवश्यक ते सर्व पाठबळ राज्य शासन देईल, असे मंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आपण 20 भाषेत बोलक्या स्वरुपात (टॉकिंग स्टोरी) आणत आहोत. याशिवाय, शिवाजी महाराजांचा इतिहास अंधांपर्यंत पोहोचावा यासाठी महाराजांचे चरित्र ब्रेल लिपीत प्रकाशित करण्याचा निर्णय आपण घेतल्याचे त्यांनी सांगितले. ‘जय भवानी जय शिवाजी’ हा चैतन्य आणि ऊर्जेचा हुंकार आहे. हा केवळ एक पुतळा नाही तर त्या माध्यमातून एक विचार आपण पाठवतोय. तो जगभरात जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
‘आम्ही पुणेकर’ या संस्थेतर्फे हा पुतळा कुपवाडा येथे उभारण्यात येत आहे. कुपवाडा येथील भारतीय सैन्याच्या छावणीत उभारण्यात येणारा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा साडे दहा फुट उंचीचा असून जमिनीपासून जवळपास तितक्याच उंचीच्या आणि ७ x ३ या आकाराच्या चौथऱ्यावर उभारण्यात येणार आहे. कुपवाडा येथील भारतीय सैन्याच्या छावणीत या पुतळ्याच्या स्थानाचे भूमीपूजन भारतीय सेनेच्या राष्ट्रीय रायफल्स च्या ४१ व्या बटालीयनचे (मराठा लाईट इन्फ्रंटरी) कमांडिंग ऑफीसर कर्नल नवलगट्टी आणि छत्रपती शिवाजी स्मारक समितीचे अध्यक्ष अभयराज शिरोळे यांच्या हस्ते दि. २० मार्च २०२३ रोजी झाले. नवीन तंत्रज्ञानाने बनविलेला छत्रपतींचा हा पुतळा जम्मू काश्मीर मधील प्रतिकूल हवामानात दिर्घकाळ तग धरेल असा बनवला गेला आहे. मुंबईतील राजभवनातून रवाना होणारा छत्रपतींचा हा पुतळा बडोदा, दिल्ली मार्गे रस्त्याने प्रवास करून साधारण दहा ते बारा दिवसात कुपवाडा येथे पोहोचेल. वाटेत बडोदा येथे आणि नवी दिल्लीत महाराष्ट्र सदनात या पुतळ्याचे स्वागत – पूजन स्थानिक नागरिकांतर्फे करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे वाटेत ठिकठिकाणी छत्रपती शिवरायांच्या या पुतळ्याचे स्वागत विविध संस्था व स्थानिक नागरिक करणार आहेत.




