पिंपरी चिंचवड : अल्पवयीन मुलाने सुसाट गाडी चालविल्याने पिंपरी चिंचवडमध्ये एक थरारक अपघात झाला. याचप्रकरणी आता या अल्पवयीन मुलाच्या वडिलांना तुरुंगात जाण्याची वेळ आली आहे. सोबतच सर्व्हिसिंग सेंटरवरील एका व्यक्तीस देखील अटक झाली आहे, त्याने गाडीची चावी या अल्पवयीन मुलाला दिली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, वडिलांचे नाव तानाजी शिंदे तर सर्व्हिसिंग सेंटरवरील व्यक्तीचे आकाश बोडके असे नाव आहे. तानाजी शिंदेंनी सेकंड हँड घेतलेली गाडी मंगळवारी सर्व्हीसिंगला टाकली होती. त्यांनी त्यांच्या अल्पवयीन मुलाला गाडी घरी घेऊन यायला सांगितली. तो त्याच्या तीन मित्रांना सोबत घेऊन सर्व्हिसिंग सेंटरवर गेला. तिथं आकाश बोडके नामक व्यक्तीने शिंदेंचा मुलगा अल्पवयीन असतानासुद्धा त्याच्या हातात गाडीची चावी दिली. तो अल्पवयीन मुलगा सुसाट वेगाने गाडी चालवत होता. पुणे-बेंगलोर महामार्गलगत पुनावळे परिसरात नियंत्रण सुटल्याने गाडी पलटली आणि थेट फर्निचर आणि ग्लास डेकोरच्या दुकानांना धडक दिली.
हिंजवडी पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि चौघांना ताब्यात घेतलं, चौकशी केली असता तो अल्पवयीन असून अकरावीचं शिक्षण घेत असल्याचं समोर आलं. याप्रकरणी अल्पवयीन चालकावर गुन्हा दाखल करून, त्याच्या वडिलांना पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्याची नोटीस देण्यात आली. त्यानंतर अल्पवयीन मुलगा आणि वडिलांच्या जबाबात संपूर्ण घटनाक्रम समोर आला. त्यामुळं पोलिसांनी आज मुलाच्या वडिलांना आणि आकाश बोडके या दोघांना अटक केली.