बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत आहे. मलकापूर- बुलढाणा बसचा भीषण अपघात झाला आहे. बसचा ब्रेक फेल झाल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि ही बस राजूर घाटात पलटी झाली. बसमधून ५५ प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या प्रवाशांमध्ये काही विद्यार्थ्यांचा समावेश असून अपघातात १० ते १५ प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
मलकापूरहून बुलढाणाकडे ही बस निघाली होती. मोहेगाव फाट्याजवळ हा अपघात झाला. राजूर घाटात आल्यानंतर बसचे ब्रेक फेल झाले, त्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला. यात काही प्रवासी जखमी झाले. दरम्यान, बसच्या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं आहे. ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. सुदैवाने या अपघातामध्ये अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
बुलढाणा आगाराकडून प्राथमिक माहिती मिळाली आहे, त्यानुसार बस क्रमांक ८३७५ चा जॉईंटर निसटला आणि बस मागे मागे जाऊ लागली. दरम्यान ब्रेक दाबत असताना एसटी बस पलटी झाली आणि हा अपघात झाला.




