नवी दिल्ली : भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनला आग लागली. मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी कुरवई स्थानकाजवळील राणी कमलापती रेल्वे स्थानकावरून निजामुद्दीनला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनच्या सी १४ या बोगीमध्ये आग लागली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक २०१७१ भोपाळ-हजरत निजामुद्दीन वंदे भारत पहाटे ५.४० वाजता निघाली. बीना स्टेशनच्या अलीकडेच आग लागली. आगीची माहिती मिळताच ट्रेन थांबवण्यात आली आणि सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. बिना रेल्वे स्थानकापूर्वी कुरवाई केथोरा येथे गाडी थांबवण्यात आली आणि प्रवासी सुखरूप उतरले. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.
कुरवाई केथोरा स्थानकावर वंदे भारत एक्सप्रेसच्या डब्याच्या बॅटरी बॉक्समध्ये आग लागल्याचे भारतीय रेल्वेने सांगितले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, काँग्रेस नेते अजय सिंह, आयएएस अविनाश लावनिया यांच्यासह अनेकजण वंदे भारत ट्रेनमध्ये प्रवास करत होते. या घटनेनंतर संपूर्ण वंदे भारत ट्रेन रिकामी करण्यात आली.




