मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे. गेल्या तीन दशकांपासून शिवसेनेची अस्मिता असलेलं धनुष्यबाण हे चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाकडून गोठवण्यात आलं आहे. निवडणूक आयोगाने हा निर्णय देऊन केंद्रीय निवडणूक आयोगाने तात्पुरत्या स्वरुपात हे चिन्ह गोठवलं आहे. त्यामुळे आता ठाकरे गट आणि शिंदे गट या दोघांनाही हे चिन्ह वापरता येणार नाहीये. त्यांना सोमवारपर्यंत नवीन चिन्हासाठी पर्याय देण्याची मुदत देण्यात आली आहे.
गेल्या तीन दशकांपासून जे चिन्ह शिवसेनेच्या अस्मितेशी जोडलेलं होतं, ते धनुष्यबाणाचं चिन्ह आता शिवेसेनेच्या हातातून निसटलं आहे. निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीच्या तोंडावर हा तात्पुरता निर्णय देत हे चिन्ह गोठवलं आहे. त्यामुळे दोन्ही गटांना आता हे चिन्ह वापरता येणार नाही. शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांचा या चिन्हावर दावा असणार नाहीये. तर सोमवारपर्यंत म्हणजेच १० ऑक्टोबरपर्यंत दोन्ही गटांना नव्या चिन्हासाठी तीन पर्याय दुपारी एक वाजेपर्यंत सादर करावे लागतील.
निवडणूक आयोगाने दिलेला हा निर्णय तात्पुरत्या स्वरुपाचा असून केवळ आगामी निवडणुकांपुरता मर्यादित असेल. हा निर्णय बदलला जाऊ शकतो. पण, आता उद्धव ठाकरे हे कोणतं चिन्हं निवडणार याची उत्सुकता लागून आहे.




