पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरातील मासुळकर कॉलनी परिसरात एका सात वर्षीय मुलाचे अपहरण करून खून केल्याची घटना समोर आली होती. आदित्य ओगले असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. सुरुवातीला खंडणीसाठी हा खून झाल्याचे कारण समोर आले होते. मात्र, पोलिसांनी या घटनेचा तपास केला असून एकतर्फी प्रेमातून ही हत्या केल्याचे समोर आले आहे. घटनेतील मुख्य आरोपी मंथन हा आदित्यच्याच सोसायटीत राहायला आहे. मंथन याचे आदित्यच्या बहिणीवर एकतर्फी प्रेम होते.
गुरुवारी सायंकाळी आदित्य हा बाहेर खेळायला जातो असं सांगून घराबाहेर पडला होता. त्यानंतर बराच वेळ झाला तरी तो घरी परतला नाही. त्यानंतर त्याच्या आई-वडिलांनी त्याचा शोध सुरू केला. मात्र, तो न सापडल्याने वडिलांनी पिंपरी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीनुसार दोन संशियताना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता आरोपीने आपला गुन्हा कबूल केला. या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी मंथन किरण भोसले आणि अनिकेत समदुर यांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेतील मुख्य आरोपी मंथन हा आदित्यच्याच सोसायटीत राहायला आहे. मंथन याचे आदित्यच्या बहिणीवर एकतर्फी प्रेम होते. या प्रेमाला घरातून विरोध होत असल्याने अनेकदा भांडणे देखील झालेली होती. या गोष्टीचा राग मनात धरून मंथन याने मित्राच्या मदतीने आदित्यच्या अपहरणाचा कट रचला. त्यांनी अपहरण करण्यासाठी मोटारीला टिंटेड ग्लास लावली. आदित्य इमारतीच्या खाली खेळायला येताच त्याने आदित्यला गाडीच्या जवळ बोलवले आणि त्याला गाडीत ओढून घेतलं. त्यानंतर त्यांनी त्याच्या नाकावर क्लोरोफॉर्म लावलेला रुमाल लावला आणि नंतर नाक-तोंड दाबून त्याचा खून केला.
आरोपींनी भोसरी एमआयडीसी येथील एका पडक्या इमारतीच्या छतावर आदित्य याचा मृतदेह ठेवला होता. दरम्यान, आरोपीने त्याच्यावर कोणीही संशय घेऊ नये यासाठी अपहरण आणि खंडणीचा बनाव रचला. त्याने आदित्यच्या घरच्यांच्या मोबाईलवर २० कोटी रुपयांची खंडणी मागण्याचा मेसेज केला. पिंपरी पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत तातडीने तपास केला आणि दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं.




