पुणे : घरकाम करण्याच्या बहाण्याने घरफोडी चोरी करणाऱ्या बंटी-बबलीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल 254.6 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. या गुन्हयात अटक केलेली महिला लोकांच्या घरी घरकाम करण्याचा बहाणा करुन एक-एक सोन्याचा दागिना चोरी करत असायची. तसेच अटक केलेला पुरुष चोरी केलेले सोन्याचे दागिने गहाण ठेवत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
यासंदर्भात स्वारगेट पोलीस स्टेशन मध्ये भारतीय दंड विधान कलम 454,457,380 खाली गुन्हे दाखल आहेत. पोलीस या चोऱ्यांचा तपास करत होते. या अनुषंगाने वरिष्ठांनी गुन्हे शाखा युनिट-२ चे पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांना गुन्हा उघडकीस आणण्याबाबत महत्वाच्या सुचना दिल्या होत्या. गुन्हा उघडकीस आणण्यासाठी युनिट-2 प्रभारी क्रांतीकुमार पाटील व स्टाफ अशी एक टिम तयार करण्यात आली होती.
दरम्यान, पोलिसांच्या टिमला खात्रीशीर माहिती मिळाली कि, दाखल गुन्हयातील संशयीत महिला व पुरुष हे दोघे स्वारगेट येथे नटराज हॉटेलजवळ सार्वजनिक रोडवर उभे आहेत. त्यानंतर या टिमने आरोपींचा शोध घेवुन त्यांना शिताफीने पकडले. रेखा राहुल क्षिरसागर (वय ३०, रा. जांभुळकर चौक, विठ्ठल मंदिरजवळ, वानवडीगाव, पुणे) आणि ऋषभ विनोद जाधव (रा. स्वामी विवेकानंदनगर, शेवकर वस्ती, बिल्डींग नं. 10, फ्लॅट नं. 301 रामटेकडी, पुणे) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडे दाखल गुन्हयातील घरफोडी चोरीबाबत चौकशी केली असता ते उडवा-उडवीची उत्तरे देवु लागले. त्यानंतर त्यांना युनिट-२ कार्यालयामध्ये नेऊन पुन्हा पुर्ण तपास केला असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी त्यांना सदर गुन्हयात अटक करुन पोलीस कस्टडीत घेतले. तपासादरम्यान आरोपीकडुन 12 लाख 73 हजार रुपये किंमतीचे तब्बल 254.६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने (100 टक्के) हस्तगत करण्यात यश आले आहेत.




