पुणे : खंडाळा घाटात रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. त्यामुळे मुंबई-पुणे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सध्या पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणारी रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद आहे. गुरुवारी मध्यरात्री मंकी हिल ते ठाकूरवाडी यादरम्यान दरड रेल्वे ट्रॅकवर कोसळली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर मदतकार्य सुरु करण्यात आले आहे.
मुंबई-पुणे रेल्वेमार्गावरील अप दिशेच्या ट्रॅकवर ही दरड कोसळली आहे. त्यामुळे पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. अनेक एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. याठिकाणी दरड कोसळल्याची माहिती मिळताच तातडीने मदतकार्य सुरु झाले. परंतु, या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरु असल्याने मदतकार्यात अडथळे येत आहेत. त्यामुळे अप लाईन पूर्व पदावर येण्यासाठी बराच वेळ लागण्याची चिन्हे दिसत आहेत.




