नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडी आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची दुसऱ्यांदा चौकशी करणार आहे. सोनिया गांधी सकाळी 11 वाजता ईडीच्या कार्यालयात चौकशीला उपस्थित राहणार आहेत. यापूर्वी 21 जुलै रोजी ईडीने सोनिया यांची सुमारे 3 तास चौकशी केली होती. प्रियंका गांधी आणि राहुल गांधी हे सोनिया गांधींसोबत ईडी कार्यालयात जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या चौकशीविरोधात काँग्रेस कार्यकर्ते देशभरात आंदोलन करणार आहेत. पक्षाचे वरिष्ठ नेते राजघाटावर जाऊन मूक आंदोलन करणार आहेत. सोमवारी काँग्रेस कार्यालयात निदर्शने करण्यासंदर्भात काँग्रेस हायकमांडसह सर्व सरचिटणीस, प्रदेश प्रभारी यांनी याबाबत रणनीती आखली होती. मात्र, राजघाटावर आंदोलन करण्यास पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. तसेच परिसरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल म्हणाले की, काँग्रेसला राजघाटावर ‘सत्याग्रह’ करायचा होता, पण दिल्ली पोलिसांकडून परवानगी मिळाली नाही आणि तेथे कलम 144 लागू करण्यात आली.
नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीने काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ५ वेळा चौकशी केली आहे. आता सोनिया गांधींची चौकशी केली जात आहे. काँग्रेसने आपल्या सर्वोच्च नेतृत्वाविरुद्ध ईडीच्या कारवाईचा निषेध केला आहे आणि ही “राजकीय सूडबुद्धीची चाल” असल्याचे म्हटले आहे.




