मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूप्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्रात दावा केला आहे की, रिया चक्रवर्ती हिने तिचा भाऊ शोविकसह अनेक वेळा गांजा विकत घेतला आणि सुशांत सिंग राजपूतला दिला.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीने गेल्या महिन्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत ३५ आरोपींविरुद्ध न्यायालयात अर्ज दाखल केला होता, ज्याची सुनावणी मंगळवारी झाली. आरोपांच्या मसुद्यानुसार, मार्च 2020 ते त्याच वर्षी डिसेंबर दरम्यान, सर्व आरोपी गुन्हेगारी कटाचा भाग होते. या सर्वांनी कोणत्याही वैध परवान्याशिवाय उच्च समाज आणि बॉलिवूडला ड्रग्ज विकले.
सुशांतच्या मृत्यूने प्रत्येकाच्या मनात अनेक प्रश्न सोडले आहेत. त्याचा मृतदेह घरातील बेडरूममध्ये पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आणि त्यानंतर आत्महत्येची बातमी पसरली. या प्रकरणात तपास यंत्रणा या प्रकरणाचा छडा लावण्यात गुंतल्या आहेत. मात्र, आजही लोकांना ही गोष्ट पचनी पडलेली नाही. सुशांतच्या जाण्यानंतर बॉलिवूडबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले. या प्रकरणाच्या तपासादरम्यान बॉलीवूडमधील ड्रग्ज प्रकरण बाहेर आले आणि एनसीबीने अनेक बड्या व्यक्तींना चौकशीसाठी बोलावले होते.




