Kuortane Games : टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून भारताची मान उंचावणारा अॅथलीट नीरज चोप्राची चमकदार कामगिरी सुरूच आहे. शनिवारी रात्री ऑलिम्पिकनंतर त्याने पहिले सुवर्णपदक जिंकले. भालाफेकपटू नीरज चोप्राने फिनलंडमधील कुओर्तने गेम्समध्ये प्रथम क्रमांक पटकावला. त्याने 86.69 मीटर थ्रो करून पहिले स्थान पटकावले आणि सुवर्णपदक जिंकले.
नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात 86.69 मीटर थ्रो केला होता. त्याचा दुसरा थ्रो फाऊल झाला होता. तिसर्या थ्रोवेळी तो घसरलादेखील होता. यानंतर तो पुढच्या 2 प्रयत्नासाठी मैदानात उतरला नाही, पण इतर कोणताही खेळाडू त्याला आव्हान देऊ शकला नाही. नीरज चोप्रा 10 महिन्यांनंतर स्पर्धेत उतरत आहे. अशा परिस्थितीत त्याला कोणतीही कसर सोडायची नाही आणि हे सुवर्णपदक त्याच्या मेहनतीचे फळ आहे.
याच महिन्यात नीरज चोप्राने पावो नुर्मी गेम्समध्ये 89.30 मीटर फेक करून राष्ट्रीय विक्रम केला. तो ९० मीटरचा टप्पा गाठेल अशी सर्वांनाच अपेक्षा होती पण त्याला तसे करता आले नाही. नीरज चोप्राने 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या केशोर्न वॉकटला मागे टाकले आहे. वॉलकॉटला केवळ 86.64 मीटर थ्रो करता आला. त्याचबरोबर सध्याचा जगज्जेता ग्रेनेडाचा अँडरसन पीटर्स याने ८४.७५ मीटरसह तिसरा क्रमांक पटकावला आहे. भारताच्या संदीप चौधरीला केवळ 60.35 मीटर थ्रो करता आला. तो 8 व्या क्रमांकावर होता.




