मुंबई : केंद्राने गेल्या आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्यासाठी पुढाकार घेतल्यानंतर देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले. शनिवारी 27 मे रोजी, सकाळी 6 वाजता दररोजच्या अपडेटदरम्यान तेल विपणन कंपन्यांनी त्यांचे दर कमी किंवा वाढवले नाहीत. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती लक्षात घेऊन उत्पादन शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी केल्यावर गेल्या आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठी घट झाली.
दिल्लीत आज पेट्रोलचा दर 96.72 रुपये प्रति लिटर तर डिझेलचा दर 89.62 रुपये आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार मुंबईत सध्या पेट्रोलची किंमत 111.35 रुपये आहे, तर डिझेलची किंमत 97.28 रुपये आहे. दुसरीकडे, कोलकाता येथे पेट्रोलचे दर प्रति लीटर 106.03 रुपये आणि डिझेलचे दर प्रति लिटर 92.76 रुपये आहेत.
गेल्या शनिवारी, म्हणजे 21 मे रोजी निर्मला सीतारामन यांनी पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रति लीटर 8 आणि डिझेलवर 6 रुपयांनी कपात करण्याची घोषणा केली. सरकारच्या निर्णयानंतर राजधानी दिल्लीत पेट्रोलच्या दरात 8.69 रुपयांनी तर डिझेलच्या दरात 7.05 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. यानंतर महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, केरळआणि राजस्थानसह अनेक राज्य सरकारांनी राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी केल्याची घोषणा केली. हे अशा वेळी करण्यात आले, जेव्हा देश वाढत्या महागाईच्या दबावाखाली आहे, जो एप्रिलमध्ये एक महिन्यांच्या उच्चांकावर होता.
देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कच्च्या तेलाच्या किमती, स्थानिक कर (व्हॅट) आणि मालवाहतुकीचे शुल्क राज्यानुसार भिन्न असतात. याशिवाय केंद्र सरकार वाहन इंधनावर उत्पादन शुल्क आकारते.




