मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात गुरुवारी 10 दिवसांत नवव्यांदा वाढ झाली. गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 80-80 पैशांनी वाढ झाली आहे. यापूर्वी बुधवारीही 80-80 पैशांची वाढ झाली होती. गेल्या 10 दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 6.40 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर सरकारने दिलेल्या पेट्रोल-डिझेलच्या दरातील कपातीचा फायदाही संपला आहे.
नव्या दरानुसार राजधानी मुंबईमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर 116.72 रुपये तर डिझेल 100.94 रुपयांवर पोहोचले आहे. तर पुण्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रति लिटर अनुक्रमे 115.37 आणि 98.12 रुपये इतके आहेत. तर उपराजधानी नागपूरमध्ये पेट्रोल 115.80 रुपये लिटर आणि डिझेल 98.37 रुपये लिटर इतके आहे. औरंगाबादमध्ये पेट्रोल 116.53 आणि डिझेल 99.23 रुपये प्रति लिटर आहे. कोल्हापूरमध्ये पेट्रोल 115.71 तर डिझेल 98.47 रुपये लिटर आहे.
दिल्लीत आज पेट्रोल आणि डिझेलचे दर 101.81 रुपये आणि 93.07 रुपये प्रति लिटर (80 पैशांनी वाढ) झाले आहेत. चेन्नईमध्ये पेट्रोलची किंमत 107.45 रुपये (76 पैशांनी वाढली) आणि डिझेलची किंमत 97.52 रुपये (76 पैशांनी वाढली) आहे, तर कोलकातामध्ये 83 पैशांची वाढ होऊन पेट्रोलची किंमत 111.35 रुपये आणि डिझेलची किंमत 96.22 रुपये झाली आहे.
किंमत 20 रुपयांपर्यंत वाढू शकते
क्रिसिल रिसर्चच्या अहवालानुसार, तेल विपणन कंपन्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 15 ते 20 रुपयांनी वाढवाव्या लागतील. या दृष्टिकोनातून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आणखी 18 रुपयांनी वाढ होऊ शकते.




