पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरात अतिशय हृदयद्रावक घटना घडली आहे. येथील एका चार वर्षीय चिमुकल्यावर खेळता-खेळता काळाने घाला घातला आहे. रस्त्यावर खोदकाम करणारा ठेकेदार आणि महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे चिमुकल्याचा जीव गेल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहे.
शहजाद अमीर सय्यद असे मृत चिमुकल्याचे नाव असून कोंढवा परिसरातील गल्ली क्रमांक १०, प्रभाग क्रमांक २७ येथे तो आपल्या आई-वडिलांसोबत राहत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी शहजाद त्याच्या काही मित्रांसह रस्त्यावर खेळत होता. दरम्यान, रस्त्याच्या एका बाजूला खोदकाम सुरू होते. यासोबतच विद्युत वाहकांचा ट्रान्सफॉर्मरही उघडा ठेवण्यात आला होता. यावेळी ४ वर्षीय चिमुकला खेळता खेळता ट्रान्सफॉर्मरजवळ गेला, यावेळी त्याने हात आत टाकला असता त्याला विजेचा जोरदार धक्का बसला आणि त्याचा मृत्यू झाला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या धक्कादायक घटनेनंतर प्रशासनाच्या हलगर्जीपणाबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “या उत्खननासाठी कंत्राटदार, सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा महावितरणकडून कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही. हे उत्खनन महावितरणच्या परवानगीशिवाय करण्यात आले आहे. या संदर्भात कोंढवा पोलिस ठाण्यात ठेकेदार आणि महावितरणच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.




