कोल्हापूर : ज्येष्ठ विचारवंत आणि सर्वसामान्यांसाठी नेहमीच पुढे येऊन संघर्ष करणारे नेते प्रा. एन. डी .पाटील यांचे वृद्धापकळाने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एन डी पाटील यांच्या निधनामुळं सर्वच स्तरातून दुःख व्यक्त केलं जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एन. डी. पाटील यांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना दोन दिवसांपूर्वी खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. तिथं उपचारादरम्यान त्यांना दोन ब्रेन स्ट्रोक येऊन गेले. त्यामुळे त्यांचे बोलणेही बंद झाले होते. ते उपचारासही फारसा प्रतिसाद देत नव्हते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून डॉक्टरांनी अथक प्रयत्न केले, मात्र आज अखेर एन. डी. पाटील यांचे निधन झाले.
सांगली जिल्ह्यातील ढवळी इथं जन्मलेल्या एन डी पाटील यांचे संपूर्ण नाव नारायण ज्ञानदेव पाटील. संपूर्ण महाराष्ट्रात ते एन डी पाटील याच नावाने परिचित होते. ते शेतकरी कुटुंबात जन्मले. त्यांनी अर्थशास्त्रात एमए केल्यानंतर पुणे विद्यापीठातून एलएलबीची पदवी घेतली. त्यानंतर ते अध्यापन क्षेत्रात कार्यरत होते. कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठ व रयत शिक्षण संस्थेत त्यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषवली होती. राजकीय क्षेत्रातही त्यांनी आपला ठसा उमटवला होता. १९४८ साली शेतकरी कामगार पक्षात त्यांनी प्रवेश केला. त्यानंतर पक्षाच्या सरचिटणीस पदापर्यंत मजल मारली.
एन डी पाटील तब्बल १८ वर्षे महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचे सदस्य होते. १९७८ ते १९८० या काळात त्यांनी राज्याचे सहकार मंत्री म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती. राज्य विधानसभेत त्यांनी कोल्हापूरचे प्रतिनिधित्व केले होते. राज्यात १९९९ साली आलेल्या लोकशाही आघाडी सरकारचे ते निमंत्रक होते. विधिमंडळाचे सदस्य म्हणून सर्वसामान्यांचे प्रश्न त्यांनी पोटतिडिकीने मांडले. लोकांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून संघर्ष करण्यासाठी त्यांचा नेहमी पुढाकार असे. सीमाभागातील मराठी भाषिकांविषयी एन. डी. पाटील यांना प्रचंड आस्था होती. त्या चळवळीत ते अखेरपर्यंत सक्रिय होते. सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं.
डॉ. एन. डी. पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्रातील शेतकरी आणि कष्टकरी वर्गाप्रती सच्ची आस्था असलेला आणि जनहिताशी अखेरपर्यंत बांधिलकी जपणारा तत्त्वनिष्ठ व निस्वार्थी नेता आज हरपला आहे. उपेक्षित लोकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी विधिमंडळातही आवाज उठवला, आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांनी सभागृह गाजवले. शेतकरी कामगार पक्षाची धुरा निष्ठेने सांभाळणार्या एन. डी. पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची जबाबदारीही त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात तितक्याच क्षमतेने पार पाडली. प्रा. एन. डी. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली!




