बुलढाणा: मलकापूर शहरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील रेल्वे उड्डाणपुलावर आज पहाटे दोन खाजगी बसचा अपघात झाला. या अपघातात दोन महिलांसह सहा जण ठार तर 20 जण जखमी झाल्याची माहिती आहे. या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांनी या अपघाताची माहिती घेतली असून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाखांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याचे निर्देश दिले आहेत.
अपघातातील एक बस अमरनाथ यात्रेनंतर हिंगोलीकडे निघाली होती, तर दुसरी खासगी बस नाशिकच्या दिशेने जात होती. नाशिकच्या दिशेने जाणार्या बसने ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला आणि यावेळी दुसऱ्या बसच्या समोर आल्याने धडक होऊन अपघात झाला. या अपघातात सहा प्रवाशांचा मृत्यू झाला असून 20 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर योग्य ते वैद्यकीय उपचार शासकीय खर्चाने करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.




