नागपूर : नागपूर येथेही आता ओमिक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग झालेला रुग्ण आढळला आहे. नागपूर महानगर पालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यात परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी नियम कठोर करण्यात आले आहेत. आरोग्य विभागाकडून व प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेऊनसुद्धा ओमिक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण राज्यात आढळत आहेत. त्यातच आता नागपूर येथेही ओमिक्रॉन व्हेरियंटचा रुग्ण आढळल्याने आरोग्य प्रशासनाची चिंता वाढली आहे.
नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन गमे यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना माहिती दिली की, नागपूरमधील रहिवासी असलेली ४० वर्षीय व्यक्ती पश्चिम आफ्रिकेतून आठ दिवसांपूर्वी परतली होती. चार डिसेंबर रोजी या व्यक्तीचे नागपूर विमानतळावर नमुने घेतले होते. त्याची कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह आली. नंतर त्याला शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि त्याचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले होते. आज आलेल्या अहवालाने त्याला ओमिक्रॉन प्रकाराची लागण झाल्याची पुष्टी केली आहे. या रुग्णाची प्रकृती स्थिर असून तो रुग्णालयात उपचार घेत आहे.
रुग्णाच्या कुटुंबातील इतर सदस्य निगेटिव्ह आले आहेत. त्यांनाही विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. चार डिसेंबर रोजी या व्यक्तीचे नागपूर विमानतळावर नमुने घेतले होते. यामध्ये तो कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. जनुकीय चाचणीत त्याला ओमिक्रॉन असल्याचे निदान झाले आहे. आता राज्यात ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे चिंता वाढत आहे.




