अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील महामार्गांचं भूमिपूजन व लोकार्पणाचा सोहळा आज पार पडला. यावेळी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. यावेळी शरद पवार यांनी नितीन गडकरी यांच्या कामाचं कौतुक केलं.
नगरमधील महामार्ग भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्याला संबोधित करताना शरद पवार म्हणाले, “रस्ते वाहतूक ही सर्वसामान्यांसाठी महत्वाची असते, त्याला गती देण्याचे काम गडकरी करत आहेत. अन्य राज्यात रस्त्याने प्रवास करताना जेव्हा लोक भेटतात, तेव्हा ते गडकरी यांची कृपा असल्याचं सांगतात. गडकरी कामं मंजूर करताना राजकारण पाहत नाहीत, मागणी काय आहे ते पाहतात. त्यामुळं सर्व पक्षाच्या लोकांची कामे होतात. इतर कार्यक्रमाला गेलं की वर्षानुवर्षे काही बदल दिसत नाही. पण गडकरी यांच्या कार्यक्रमाला गेलं की दोन चार दिवसांत फरक दिसतो. एखादा नेता देशाच्या उभारणीत कसं योगदान देतो हे गडकरी यांच्याकडे पाहून लक्षात येतं, असं म्हणत पवारांनी गडकरींच्या कामाचं कौतुक केलं.
“रस्ते, पिके व विकासाची परिस्थिती पाहायला मिळते, त्यामुळं मी शक्यतो रस्त्यानं प्रवास करतो. मी यावं असं गडकरींचं म्हणणं होतं. त्यामुळं मला येणं भाग पडलं. मी आल्यावर या भागातील कामे मार्गी लागतील म्हणून आलो,” असं यावेळी शरद पवार म्हणाले.




