नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरू आहे. या आठवड्याची सुरुवात देखील गोंधळाने झाली. लोकसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आलं असून काल राज्यसभा सभापतींवर पुस्तक भिरकावल्याच्या घटनेची सभापती व्यंकय्या नायडू यांनी निंदा केली आहे. राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यावेळी भावूक झालेले दिसले.
सदनात काल झालेल्या घटनेवर सभापतींनी निराशा व्यक्त केली. विरोधी पक्ष सदनाची मर्यादा विसरल्याची टिप्पणीही त्यांनी केली. तसंच अशा घटना पुन्हा होता कामा नये, असंही त्यांनी यावेळी बजावलं. व्यंकय्या नायडू म्हणाले की, विरोधक सरकारला सक्ती करू शकत नाहीत. सदस्य निषेध करू शकतात, परंतु अध्यक्षांना काय करावे, काय करू नये हे सांगू शकत नाहीत. ते म्हणाले की, ज्या प्रकारे लोकशाहीचे पावित्र्य नष्ट केले गेले, त्यामुळे मी दुखावलो आहे. माझ्या वेदनेचे वर्णन किंवा निषेध करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या खासदारांविरोधात कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.
लोकसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहे. कनिष्ठ सभागृह नियोजित वेळेच्या दोन दिवस आधी तहकूब करण्यात आले आहे. सभागृहात सतत होणारा गोंधळ लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर विरोधी नेत्यांनी केलेल्या घोषणाबाजी लक्षात घेता राज्यसभेचे कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू झाले आहे.




