सिंधुदुर्ग : प्रसिद्ध गझलकार मधुसूदन नानिवडेकर यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ६१ वर्षांचे होते. सिंधुदुर्गातील खारेपाटण येथील नानिवडे येथील रहिवासी असलेले नानिवडेकर हे साहित्य क्षेत्रात गझलकार म्हणूनच ओळखले जातात.
मधुसूदन नानिवडेकर यांनी वयाच्या १७ व्या वर्षापासून कविता लिहिण्यास सुरुवात केली होती. राज्यभरात त्यांनी गझलांचे अनेक कार्यक्रम केले होते. त्यांना उत्स्फूर्त प्रतिसादही मिळत होता. गझल क्षेत्रात नाव कमावणारे नानिवडेकर हे व्यवसायाने पत्रकार होते. साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते. सिंधुदुर्गातील दिवंगत साहित्यिकांचा परिचय करून देणाऱ्या ‘साहित्य सिंधू’ या पुस्तकाचं संपादन त्यांनी केलं होतं. ‘चांदणे नदीपात्रात’ हा त्यांचा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. नवी मुंबईतील वाशी इथे झालेल्या ९ व्या अखिल भारतीय गझल संमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं होतं.




