वडोदरा : एका व्यक्तीने पोलिसांकडे दोन भुतांविरुध्द तक्रार केली आहे. गुजरातमधील पंचमहाल येथे एक व्यक्ती रविवारी दुपारी जंबुगोडा पोलिस स्टेशनमध्ये पोहोचला. त्याच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी दोन भुतांविरुध्द तक्रार दाखल करून घेतली आहे. तक्रार देत असताना ही व्यक्ती भीतीने थरथर कापत होती.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार माणूस 35 वर्षांचा असून पंचमहालच्या जंबुगोडा तालुक्यातील एका खेड्यात राहतो. त्याने पोलिसांत तक्रार दिली की भुतांच्या एका समूहाने त्याचा पाठलाग केला, त्यानंतर दोन भुतांनी त्याला पकडले, परंतु आपला जीव वाचविण्यासाठी तो कसा तरी त्यांच्या तावडीतून सुटला आणि पोलिस स्टेशनमध्ये आला. तो खूप घाबरलेला होता आणि थरथर कापत होता. तो पोलिसांना म्हणाला की मला भूतांपासून वाचवा. पोलिसांना हे प्रकरण विचित्र वाटले, पण पीडित व्यक्तीच्या समाधानासाठी पोलिसांनी त्याची तक्रार नोंदवून घेतली. त्याने पोलिसांना सांगितले की तो शेतात काम करीत असताना भुतांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला.
पीएसआय मयंकसिंग ठाकूर यांनी सांगितले की, रविवारी ते पावागड येथे ड्यूटीवर असताना तो माणूस पोलिस ठाण्यात आला. तो खूप अस्वस्थ होता आणि घाबरलेला होता. त्याला शांत आणि सामान्य करण्यासाठी त्यांनी त्याची तक्रार नोंदवून घेतली.
दरम्यान, पोलिसांनी त्या तरूणाच्या कुटूंबाशी संपर्क साधला. तेव्हा त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी सांगितले की तो मनोरुग्ण असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तथापि, गेल्या 10 दिवसांपासून त्याने औषध घेतले नव्हते. पोलिसांनी तक्रार घेऊन त्या व्यक्तीला घरी पाठवले. सोमवारी पोलीस त्या माणसाशी बोलले तेव्हा त्याने सांगितले की तो पोलिस स्टेशनमध्ये गेला कारण भूतांपासून पोलिस त्याचा जीव वाचवत असा त्याचा विश्वास होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला सुरक्षेविषयी आश्वासन दिले आणि त्याला नियमित औषधे घेण्यास सांगितले.




