सना : लहान मुलांच्या हत्या आणि बलात्कार प्रकरणातील तीन आरोपींना भर चौकात गोळ्या मारून ठार करण्यात आले. येमेनची राजधानी सना शहरात इराणचा पाठिंबा असलेल्या हुती बंडखोरांनी ही शिक्षा दिली. येमेनमध्ये २०१८ नंतर पहिल्यांदाच अशाप्रकारे शिक्षा देण्यात आली आहे. हे आरोपी बलात्कार आणि हत्या प्रकरणात दोषी आढळले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, तिन्ही आरोपी येमेनचे नागरीक आहेत. या आरोपींनी जघन्य गुन्हे केलेले होते. बुधवारी या तीनही आरोपींना सना शहरातील तहरीर (लिबरेशन) चौकात नेण्यात आले. त्यावेळी त्यांच्या अंगावर निळ्या रंगाचा कैद्यांचा गणवेश होता. तेथे त्यांच्यावर गोळ्या घालण्यापूर्वी त्यांना त्यांचा चेहरा चादरीवर खाली टेकवण्यास सांगितले होते. त्यानंतर लष्करी गणवेश घातलेल्या एका व्यक्तीने या तिघांच्या पाठीवर एके-४७ ने गोळ्या घातल्या. गोळ्या झाडून ठार केल्यानंतर या आरोपींचे मृतदेह क्रेनच्या साहाय्याने काही वेळ हवेत लटकवण्यात आले होते. त्यानंतर त्यांचे मृतदेह दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आले.
लहान मुलांच्या हत्या प्रकरणातील आरोपी अल नोआमी (४० वर्ष) याने आपल्या पत्नीशी मतभेद झाल्यानंतर आपल्या तीन मुलींना मारण्यासाठी एका पाण्याच्या टाकीत सोडून दिले होते. त्यात त्यांचा मृत्यू झाला. अब्दुला अल-मुकाहाली (३८ वर्ष) आणि मोहम्मद अब्दुल्ला अरमान (३३ वर्ष) या दोघांनी आठ वर्षांच्या मुलावर बलात्कार करून त्याचा खून केला होता.




