अमरावती : अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नवनीत राणा यांनी सादर केलेले जात प्रमाणपत्र अवैध आहे. या प्रकरणी खासदार नवनीत राणा यांना दोन लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असून येत्या सहा आठवड्यात त्यांनी सर्व प्रमाणपत्रं जमा करावे, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हा निकाल दिला.
अमरावती लोकसभा मतदारसंघ अनुसूचीत जातींसाठी राखीव मतदार संघ होता. त्या मतदारसंघातून नवनीत राणा निवडून आल्या. त्यांच्या या निवडीवर आक्षेप घेत शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याचं सांगत त्यांना दोन लाख रुपये दंड आणि सहा आठवड्यात सर्व प्रमाणपत्र जमा करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, या प्रकरणामुळे नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात आल्याची चर्चा सुरु झाली आहे.




